(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लाच घेताना जीएसटीचे दोन अधिकारी सीबीआयच्या जाळ्यात, कोल्हापुरात कारवाई
Kolhapur News : जीएसटी विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना 50 हजार रूपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
Kolhapur News Update : जीएसटी (GST) विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना 50 हजार रूपयांची लाच घेताना सीबीआयने (Central Bureau Of Investigation) रंगेहात पकडले आहे. अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा अशी या दोन अधिकाऱ्यांची नावे आहेत.
सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेला तक्रारदाराच्या सीएमार्फत आरोपींनी 50 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार मिळाली झाली होती. तक्रारदाराने 2017-18 ते 2020 मधील सेवाकर दायीत्वाबद्दल प्रकरण निकाल काढण्यासाठी अर्ज केला होता. सेवाकर दायीत्वाबद्दलचे हे प्रकरण निकालात काढण्यासाठी जीएसटी अधिकाऱ्यांनी तक्रारदाराकडून 75 हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीनंतर 50 हजार रूपये घेण्याचे ठरले. या तक्रारीची खातरजमा करून सापळा रचण्यात आला. यावेळी 50 हजार रूपये घेताला या दोघांना रंगेहाथ पडकण्यात आले.
आरोपींना एक दिवसाची पोलीस कोठडी
दरम्यान, अटक करण्यात आलेल्या अधीक्षक महेश नेसरीकर आणि निरीक्षक अमित मिश्रा या संशयितांना लोचलुचपत विभागाने जयसिंगपूर येथील कोर्टात हजर केले. कोर्टाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
घरांची झडती
लाचलुचपत विभागाने संशयित आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर जयसिंगपूर आणि कोल्हापूर येथील त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. या झडतीत सापडलेली काही आक्षेपार्ह कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. सीबीआयकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, जीएसटी अधिकाऱ्यांवर कारवाई झाल्यानंतर कोल्हापूर आणि जयसिंगपूर येथील व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या 1 महिन्यात सीबीआयने केंद्रीय जीएसटी आणि जीएसटीच्या सुमारे अर्धा डझन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक केली आहे. अद्यापही सीबीआयची कारवाई सुरूच आहे.
महत्वाच्या बातम्या