Kalyan Crime : पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटली, अन् पत्नी... ; अंबरनाथमधील धक्कादायक घटना
Kalyan Crime News : पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटून थेट पत्नीला लागल्यानं पत्नी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी पतीविरोधात अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Kalyan Crime News : पतीच्या रिव्हॉल्वरमधून चुकून गोळी सुटून पत्नी जखमी झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. याप्रकरणी पतीच्या विरोधात अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.
अंबरनाथच्या चिखलोली पाड्याजवळील पवार सेक्शन भागात उद्योजक अविनाश पवार राहतात. पवार यांनी त्यांचं परवानाधारक रिव्हॉल्वर घराच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलं होतं. दरम्यान अविनाश यांच्या पत्नी अनिता पवार या ड्रॉव्हरमधून मेडिकलची फाईल काढण्यासाठी गेल्या असता त्यांच्याकडून हे रिव्हॉल्वर चुकून खाली पडलं. हे रिव्हॉल्वर भरलेलं असल्यानं ते खाली पडताच त्यातून एक गोळी सुटली आणि ती थेट अनिता यांच्या पायात घुसली. ही घटना घडताच घरातील सदस्यांनी धाव घेत अनिता यांना तात्काळ डोंबिवलीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.
सध्या अनिता पवार यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अनिता यांचे पती परवानाधारक अविनाश पवार यांच्याविरोधात आर्म्स अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून रिव्हॉल्वरची योग्य काळजी न घेतल्यानं हे रिव्हॉल्वरही पोलिसांनी जप्त केलं आहे.
दरम्यान, या घटनेबाबत आधी सासऱ्यांची दरवाजाला लावलेली पँट धुण्यासाठी घेत असताना त्या पँटला लावलेलं रिव्हॉल्वर खाली पडलं आणि त्यातून गोळी सुटली, असा देखील बनाव रचण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे रिव्हॉल्वर जखमी महिलेच्या सासऱ्याचं नसून पतीचं असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता नेमकं सत्य काय? हे मात्र अनुत्तरीतच आहे. दरम्यान, या सगळ्याबाबत पवार कुटुंबियांशी प्रतिक्रियेसाठी एबीपी माझानं संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांची बाजू कळू शकलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Jalgaon Crime : पोलीस भरतीच्या परीक्षेत 'हायटेक कॉपी'चा प्रयत्न; जळगावातील मुन्नाभाई अटकेत, लघुशंकेसाठी अनेकवेळा बाहेर पडल्यानं पोलखोल
- रेल्वेत विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी एनसीबीच्या बड्या अधिकाऱ्याला अटक!
- Exclusive : ड्रग्स सप्लायरविरुद्ध लढा कठीण, आमच्यावर गंभीर हल्ले झालेत मात्र कारवाई करणारच: समीर वानखेडे