Thane Crime News : आरटीआय कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकविणाऱ्या चार जणांना अटक, पोलिसांच्याही अंगलट येणार?
Ulhasnagar Crime News : उल्हासनगर शहरातील एका आरटीआय कार्यकर्त्याला शस्त्र कायद्यांतर्गत खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाने दणका दिला आहे.
ठाणे : उल्हासनगर शहरातील एका आरटीआय कार्यकर्त्याला शस्त्र कायद्यांतर्गत खोट्या गुन्ह्यात अडकवणाऱ्या उल्हासनगरातील मध्यवर्ती पोलिसांचा उच्च न्यायालयाने चांगलाच समाचार घेतला आहे. सदर प्रकार हा मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या चांगलाच अंगलट येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. या गुन्ह्याच्या तपासाची सुत्रे पोलीस उपायुक्त डॉ.सुधाकर पठारे यांनी स्वतः हातात घेतली असून या गुन्ह्याचे षडयंत्र रचणाऱ्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, या प्रकरणात काही पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता असल्याचे समजत आहे.
आरटीआय कार्यकर्त्याला खोट्या गुन्ह्यात अडकण्याचा प्रयत्न
29 जानेवारी 2022 ला उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पथकाने एका दुकानात घुसून आरटीआय कार्यकर्ता मोती दुसेजा याला मारहाण करीत दुकानाबाहेर काढत थेट मध्यवर्ती पोलीस ठाण्यात आणलं. त्यानंतर दुसेजा यांच्या खिशात गावठी कट्टा मिळाल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलिसांनी दाखल केला होता. हा सर्व प्रकार महसूल कार्यालयात सुरु असलेल्या अरबो रुपयांच्या सनद घोटाळ्याच्या संदर्भातील आहे.
विणाऱ्या चार जणांना अटक, पोलिसांच्याही अंगलट येणार
अरबो रुपयांच्या सनद घोटाळ्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने महसूल अधिकारी आणि दलालांनी पोलिसांबरोबर कट रचून बोगस गुन्ह्यात फसविल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ता मोती दुसेजा यांनी केला होता. तसेच, त्यांनी आपल्यावरील खोट्या गुन्ह्यांची फिर्याद रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मोती दुसेजा यांनी न्यायालयात एक सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुरावे सादर केले होते. यामुळे पोलिसांनी दाखल केलेल्या या गुन्ह्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांना चौकशीचे आदेश
या प्रकरणात आता उच्च न्यायालयाने या गुन्ह्या प्रकरणी थेट पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांना चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणात माफीची साक्षीदार बनलेली हिना शेखने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आसिफ बानोला ताब्यात घेऊन बोलते केलं. त्यानंतर अजित भाटिया, सलमान शेख आणि अशोक बजाज यांना अटक केली. अटक करण्यात आलेल्या चार ही आरोपींना उल्हासनगरच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन पाच दिवसांचा पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होण्याची शक्यता
या प्रकरणात स्वतः पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे हे तपास करत आहेत. मात्र या प्रकरणात आणखी काही नावे समोर येणार असून पोलीस अधिकाऱ्यांवर देखील कारवाई होणार असल्याची चर्चा उल्हासनगर शहरात रंगली आहे मात्र या प्रकरणात पोलीस कोणत्याही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.