Dhule Crime : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस अॅक्शन मोडवर, ऑलआऊट ऑपरेशन राबवत टवाळखोरांना दणका, पिस्तुलांसह तलवारी जप्त
Dhule Crime News : धुळ्यात नाकाबंदी आणि ऑलआऊट ऑपरेशन राबवून पोलिसांनी टवाळखोरांना दणका दिला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस अॅक्शन मोडवर झाल्याचे दिसून येत आहे.
Dhule Crime News धुळे : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. धुळे जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election 2024) आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस (Police) प्रशासनाच्या वतीने नाकाबंदी आणि ऑलआऊट ऑपरेशन (All-out Operation) राबवून तब्बल सहा पिस्तुल आणि चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे (Shrikant Dhivare) यांनी नाकाबंदी आणि ऑल आऊट ऑपरेशन राबविण्यास सुरुवात केली आहे.
सहा पिस्तुल आणि चार तलवारी जप्त
शुक्रवारी जिल्हा पोलीस प्रशासनाने राबवलेल्या ऑल आऊट ऑपरेशन आणि नाकाबंदी दरम्यान सहा पिस्टल आणि चार तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच तब्बल 1 हजार 31 दुचाकी आणि चार चाकी वाहनांची तपासणी करण्यात आली असून यात ड्रिंक अँड ड्राईव्हच्या 21 केसेस नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच दारूबंदी कायद्यान्वये नऊ केसेस करण्यात आल्या असून यात तब्बल 30 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्यान्वये 149 केसेस करण्यात आल्या असून 1 लाख 23 हजार 750 रुपयांच्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर चित्रफीत पाहून दुचाकी चोरल्या
दरम्यान, धुळ्यातील निरनिराळ्या भागातून दुचाकी चोरणाऱ्या संशयित चौघांना एलसीबीने ताब्यात घेतले. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. त्यांनी सोशल मीडियावरील चित्रफीत पाहून चावीविना वाहन कसे सुरू करावे, याबाबत माहिती मिळवत ही चोरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून पाच लाखांच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. शहर आणि आझादनगर भागातून दुचाकींची चोरी झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित मुले चाळीसगाव रोडवर हिंडत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले. त्याने त्याच्या मित्राचे नाव सांगितले. त्यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघा अल्पवयीन मुलांनी रूपेश बारहाते, विपुल बच्छाव, अमित ऊर्फ बंटी गावडे, ऋतिक ऊर्फ निकी पंजाबी यांच्या मदतीने संजय गुजराथी, बलजितसिंग बराड यांना चोरीच्या दुचाकी विक्री केल्याची माहिती पोलिसांना दिली. नंतर पोलिसांनी संशयित बारहाते, बच्छाव, पंजाबी आणि गुजराथी याला ताब्यात घेण्यात आले. पोलीस पुढील तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या