मोठी बातमी : सिंधुदुर्ग जंगलात आढळलेल्या परदेशी महिलेबाबत सर्वात मोठा ट्विस्ट, स्वतःच साखळीने बांधल्याचा अंदाज
Sindhudurg Foreign Woman Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात एक मूळ अमेरिकन महिलेला साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
Sindhudurg Crime सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सोनुर्ली रोणापाल येथील घनदाट जंगलात एक मूळ अमेरिकन महिला (Sindhudurg Foreign Woman News) साखळदंडांनी बांधलेल्या अवस्थेत आढळून आली होती. या अमानवी घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर या महिलेला अधिक उपचारासाठी सिंधुदुर्गमधून रत्नागिरी येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान ती महिला प्रथमदर्शी मानसिक रुग्ण असल्याचंही बोलले जातं होतं. मात्र, आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आल्याचे बोलले जात आहे.
मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत या महिलेने स्वत: हुन हा प्रकार करून समाजासह पोलीस आणि आरोग्य यंत्रणेची झोपच उडवून देण्याचा प्रयत्न केल्याचे एकंदर तपासामधील बाबींवरून पुढे आले आहे. मात्र, सिंधुदुर्ग पोलिसांनी या बाबत अद्याप काहीच स्पष्ट केले नसून सदर महिलेवर सध्या रत्नागिरी येथील शासकीय मानसोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिलेने स्वतःच साखळीने बांधल्याचा अंदाज
या संपूर्ण घटनेतील अमेरिकन महिलेला सोनुर्ली रोनापाल जंगलातून ताब्यात घेतल्यानंतर तिने दिलेल्या एकमेव जबाबात नवऱ्याने आपणास या जंगलात आणून बांधून ठेवल्याचं आणि आपणास उपाशी ठेवून आपला शारीरिक छळ केल्याचे स्पष्ट केले होते. या तिच्या प्राथमिक जबाबानुसार पोलिसांनी तिच्या नवऱ्याविरुद्ध गुन्हादेखील दाखल केला. परंतु आठवडाभराच्या तपासात 'त्या' महिलेने दिलेल्या पत्त्यावर तिने नवरा म्हणून ज्या व्यक्तीचे नाव दिले, त्या नावाच्या व्यक्तीचे अस्तित्व कुठेच आढळून आले नाही. एवढेच नव्हे, तर तिने तामिळनाडूच्या आपल्या निवासस्थानाचा जो परमनंट पत्ता दिला होता, त्या पत्यावर निवासस्थान नसून एक दुकान असल्याचे आढळून आले.
मोबाईल व टॅबमध्ये आढळली धक्कादायक माहिती
वरील शक्यतेला पुष्टी देणारी सर्वात धक्कादायक बाब अशी की, काही महिन्यांपूर्वी तिच्यावर गोव्यातील बांबोळी येथील इस्पितळात तसेच अन्य काही इस्पितळांमध्ये मानसिक उपचार झाल्याचे देखील उघडकीस आले. आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे सदर महिले जवळील मोबाईल व टॅबवर आढळलेल्या माहितीनुसार त्या महिलेचा मुंबई आणि गोवा येथील आतापर्यंत जो वावर आढळून आला, तिथे ती एकटीच आढळून आली आहे. त्यामुळे ती ज्या स्थितीत जंगलात आढळून आली आणि तिने जो जबाब दिला, तो बनाव असल्याची शक्यता अधिक वाटत आहे. वरील सर्व शक्यता वाटत असल्या तरी सिंधुदुर्ग पोलिसांनी मात्र याबाबत ठोस असं काहीही स्पष्ट केलेलं नाही. या महिलेला आता अधिक उपचारा करिता रत्नागिरी येथील शासकीय मनोरुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या ठिकाणी ती महिला ज्यावेळी औषधोपचार घेऊन पूर्ववत मानसिक स्थितीत येईल त्यावेळीच यावर स्पष्ट असा खुलासा होऊ शकतो.
हे ही वाचा