Chhatrapati Sambhajinagar Crime: विश्वास नांगरे पाटलांचा AI चेहरा वापरला, सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 78 लाखांना लुटलं, छ. संभाजीनगर हादरलं!
Chhatrapati Sambhajinagar Crime : विश्वास नांगरे पाटील यांच्या AI चेहऱ्याचा वापर करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 78 लाखांना लुटल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर शहरात दहशतवाद्यांच्या खात्यावरून तुमच्या बँक खात्यात 20 लाख जमा झाल्याचा बनाव रचत सेवानिवृत्त अधिकाऱ्याला सायबर गुन्हेगारांनी (Cyber Crime) 6 दिवसांत तब्बल 78 लाख 60 हजारांना लुटले. या दरम्यान आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील (Vishwas Nangre Patil) यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल करून वृद्धाला विश्वास ठेवण्यासाठी भाग पाडले. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) एकच खळबळ उडाली आहे.
77 वर्षीय तक्रारदार हे विभागीय आयुक्तालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. 2 जुलै 2025 रोजी त्यांना पोलिसांचा गणवेश घातलेल्या व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला. संजय पिसे असे नाव सांगून तो विश्वास नांगरे पाटील यांचा सहकारी असल्याची बतावणी करण्यात आली. तुमच्या पत्नीच्या बँक खात्यात 2 कोटींचा बेहिशेबी व्यवहार झाला आहे. त्याचा संबंध दहशतवादी अब्दुल सलाम याच्यासोबत निष्पन्न झाला आहे.
सेवानिवृत्त अधिकाऱ्याला 78 लाखांना लुटलं
त्याच्याकडून तुम्हाला 20 लाख रुपये आल्याने एनआयएकडून गुन्हा दाखल करून अटकेची थाप मारण्यात आली. यानंतर तक्रारदार घाबरून गेले. गुन्हेगारांनी तक्रारदाराला थेट आयपीएस नांगरे पाटील यांच्याशी सल्लामसलत करण्याचा सल्ला दिला. डिजिटल अरेस्टची बाब राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा असल्याने कोणालाही सांगितल्यास कुटुंबाला अटक करून संपत्ती जप्त करण्यात येइर्ल, असा इशारा देखील देण्यात आला. यानंतर, तक्रारदाराने त्यांच्यासह पत्नीच्या नावे असलेले 78 लाख 69 हजार रुपये 2 ते 7 जुलैपर्यंत सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या तीन बँक खात्यांवर पाठवले. चौकशीनंतर ही रक्कम परत देण्यात येईल, अशी थाप गुर्हेगारांनी मारली होती.
सायबर गुन्हेगारांची अशीही बनवाबनवी
तक्रारदाराचा विश्वास बसण्यासाठी सायबर गुन्हेगारांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या विभागातून बोलत असल्याचे सांगितले. 4 जुलै रोजी व्हिडीओ कॉलवर नांगरे यांच्यासारख्या दिसणाऱ्या व्यक्तीने संवाद साधत, मराठीच असल्याचे सांगून विश्वासात घेतले होते. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून सायबर गुन्हेगारांचा शोध घेतला जात आहे.
नांगरे-पाटलाचं नाव घेऊन राज्यात किती लोकांना फसवलं?
- जून 2025 मध्ये नांगरे यांच्या नावाचा वापर करत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या सेवानिवृत्त उच्च पदस्थ अधिकाऱ्याला शेअर्स विकायला लावून 60 कोटींचा गंडा घालण्यात आला होता.
- जून 2025 मध्ये कोल्हापूरच्या 3 सेवानिवृत्त प्राध्यापिकेकडून नांगरे यांच्याच नावाने 3 कोटी रुपये उकळण्यात आले होते.
- जून 2025 मध्ये नांगरे यांच्याच 3 नावाने व्हिडीओ कॉल करून बीडमध्ये सेवानिवृत्त शिक्षिकेकडून 8 लाख रुपये उकळण्यात आले.
- 4 ऑगस्ट 2024 मध्ये याच पद्धतीने ज्येष्ठ महिलेकडून 23 लाख रुपये उकळण्यात आले होते.
आणखी वाचा
























