Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
गोळीबार, हत्या दोन्ही प्रकरणांसाठी एकूण 8 पथके तैनात असल्याचं बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी सांगितलं आहे.
Beed: बीड शहरात गेल्या काही दिवसांपासून हत्या, गोळीबार अशा घटनांनी भीतीचं वातावरण आहे. बीड शहरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर घरात घुसून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून एक आरोपीला अटक केलीय, तर या घटनेच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
बीड शहरातील इमामपूर भागात विश्वास डोंगरे या तरुणावर अक्षय आठवले याने जुन्या भांडणाच्या रागातून घरात घुसून गोळीबार केला. या घटनेत विश्वास डोंगरे जखमी असून उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी विशेष पथक नेमून या प्रकरणात एकाला अटक केलीय. तर इतर आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिली.
दोन गुन्ह्यांसाठी आठ पथके तैनात
गोळीबार प्रकरणात एक आरोपी अटकेत असून इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचंही बीड पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.बीडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात आणि सरपंच हत्या प्रकरणात तपासासाठी एकूण आठ पथके तैनात असल्याचं सांगण्यात आलं आहे.
गोळीबाराचे कारण अस्पष्ट, तपास सुरु
बीडमध्ये काही दिवसांपूर्वी बनावट नोटांचे प्रकरण उघडकीस आले होते. या प्रकरणात संशयित आरोपी असलेल्या व्यक्तीकडून हा धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. जुन्या वादातून बीड शहरातील पेठ भागात घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडली. या घटनेत विश्वास डोंगरे नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून गोळीबारानंतर या व्यक्तीस छत्रपती संभाजीनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. गोळीबार नक्की कोणत्या कारणातून करण्यात आला याबाबत तपास सुरु असून या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष पथक नेमण्यात आले आहे.
संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात दोघांना अटक
दरम्यान, केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख व त्यांचा वाहन चालक हे सोमवारी चारचाकी गाडीतून मस्साजोगकडे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांची गाडी अडवून त्यांचे अपहरण केले होते. तसेच त्यांना बेदम मारहाण करत अपहरणकर्त्यांनी त्यांना बळजबरीने आलेल्या गाडीत बसवून केजच्या दिशेने नेले होते. काही तासानंतर बोरगाव-दहीटना रस्त्यावर संतोष देशमुख यांचा मृतदेह आढळून आला होता. यामुळे बीडमध्ये मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर इतर आरोपींचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
हेही वाचा:
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट; केज पोलीस ठाण्याचे पीआय प्रशांत महाजन सक्तीच्या रजेवर