तब्बल 22 वर्षांनी मिळालं चोरी गेलेलं कोट्यवधींचं सोनं! 1998 साली पडलेला कुलाब्यात दरोडा
1998 Colaba robbery : 1998 मध्ये कुलाबा येथे राहणाऱ्या अर्जुन दासवानी नावाच्या व्यावसायिकाच्या घरी दरोडा पडला होता. ही घटना 6 एप्रिल 1998 रोजी सकाळी 8च्या सुमारास घडली होती.
मुंबई : तब्बल 22 वर्षांनंतर मुंबईतील कुलाबा (1998 Colaba robbery) परिसरात राहणाऱ्या एका व्यावसायिकाला त्याचे वडिलोपार्जित सोने परत मिळाले, त्यानंतर कुटुंबीय भावुक झाले. कुलाबा विभागाचे एसीपी पांडुरंग शिंदे यांनी माहिती देताना सांगितले की, 1998 मध्ये कुलाबा येथे राहणाऱ्या अर्जुन दासवानी नावाच्या व्यावसायिकाच्या घरी दरोडा पडला होता. ही घटना 6 एप्रिल 1998 रोजी सकाळी 8च्या सुमारास घडली होती.
दरोड्यावेळी दासवानी पत्नी, मुलं आणि नोकरासह घरातच होते. तेवढ्यात त्यांच्या दाराची बेल वाजली आणि त्यांनी दरवाजा उघडताच, चार जण चाकू घेऊन घरात घुसले आणि दासवानी यांच्यासह घरातील सर्व लोकांना खुर्चीला बांधून, दासवानी यांना मारहाण देखील केली.
कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी चावी दिली!
दरोडेखोरांनी घरात लॉकर कुठे आहे, अशी विचारणा केली. मारहाण आणि चाकूच्या धाकाने घाबरलेल्या दासवानी यांनी घरातील सदस्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन, घराच्या लॉकरची चावी दरोडेखोरांना दिली होती. याचा फायदा घेत त्यांच्या घरातील ऐवज लुटला. दरोडेखोरांनी घरातून दोन नाणी घेतली, ज्यावर राणी व्हिक्टोरिया आणि राणी एलिझाबेथ यांचा फोटो होता. याशिवाय सोन्याचे ब्रेसलेट आणि इतर दागिने होते.
त्यावेळी त्यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम 342, 394, 397, 452 आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे एसीपी शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी त्या सोन्याची किंमत 13 लाख 45 हजार रुपये होती, जी आजच्या काळात दीड कोटींपेक्षा जास्त असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आता त्याचे वारसा मूल्य किती असेल, हे सांगणे देखील कठीण आहे.
खटल्याची सुनावणी
शिंदे यांनी पुढे सांगितले की, या प्रकरणात एकूण 9 आरोपी होते, त्यापैकी एक आरोपी अद्याप पोलिसांना सापडलेला नव्हता. 2002 मध्ये या प्रकरणी न्यायालयाचा आदेश आला होता, त्यात 3 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. त्यातील एक आरोपी अद्याप ताब्यात यायचा होता, त्यामुळे न्यायालयाने चोरांकडून जप्त केलेले सोने आपल्याकडेच ठेवण्यास सांगितले होते. जोपर्यंत वॉन्टेड आरोपी सापडत नाही आणि त्यांची सुनावणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत काळजी घ्यावी, असे न्यायालयाने म्हटले होते.
...आणि सोने परत मिळाले!
दासवानी यांचे वकील सुनील पांडे यांनी एबीपी न्यूजला सांगितले की, गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मुंबई आयुक्तांनी अशा सर्व प्रकरणांमध्ये जप्त केलेले सोने आणि चांदी त्याच्या मालकाला परत करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तक्रारदार अर्जुन यांचा मुलगा राजू दासवानी याला पत्र पाठवून याबाबत माहिती दिली आणि त्यानंतर त्याने वकील पांडे यांच्या मदतीने सत्र न्यायालयात अर्ज केला, त्यानंतर न्यायालयाने त्याला सोने परत करण्याचे आदेश दिले.
राजू यांच्या वडिलांचे 2007 मध्ये निधन झाले, तेव्हापासून त्यांना हे सोने इतक्या लवकर मिळेल असे वाटले नव्हते. पण सोने मिळताच त्यांचे संपूर्ण कुटुंब खूप भावुक झाले.
हेही वाचा :
- धक्कादायक... PUBGचं घातकी व्यसन! 14 वर्षाच्या मुलानं अख्ख्या कुटुंबाला गोळ्या घालून संपवलं
- इंग्रजीच्या भीतीनं साताऱ्यात विद्यार्थीनीची आत्महत्या तर कोल्हापुरात शिक्षकाच्या त्रासाला कंटाळून युवतीची आत्महत्या
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha