सणासुदीच्या काळात पारंपरिक मिठाईंच्या विक्रीत वाढ; रसमलाई, गुलाब जामुन आणि फ्युजन स्वीट्सना सर्वाधिक पसंती
Diwali News : सणासुदीच्या आधी घेतलेल्या व 1,000 हून अधिक ग्राहक आणि 100 रेस्टॉरंट्सचा सहभाग असलेल्या या सर्वेक्षणातून पारंपरिक भारतीय मिठाईंना स्पष्ट प्राधान्य मिळत असल्याचं समोर आलंय.
मुंबई : सणासुदीच्या तोंडावर पारंपरिक मिठाईच्या विक्रीत मोठी वाढ झाल्याचे रेस्टॉरंट्स आणि केटरिंग उद्योगक्षेत्रासाठी भारतीय मिष्टान्ने पुरविणारी अग्रगण्य बी2बी इनोव्हेटर कंपनी स्कॅडलस फूड्सने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. सणासुदीच्या काळातील ग्राहकांच्या आवडीनिवडींची तपशीलवार माहिती उघड करणारा सर्वेक्षण अहवाल कंपनीने प्रसिद्ध केला असून या अहवालाने पारंपरिक भारतीय मिठाईच्या वर्चस्वावर प्रकाशझोत टाकला आहे. सणासुदीच्या काळात नेहमी खाल्ल्या जाणाऱ्या गोडाधोडाच्या पदार्थांमध्ये या मिठाईंनी पाश्चात्य डिझर्ट्स आणि आइसक्रीम्सना मागे टाकले आहे.
सणासुदीच्या आधी घेतलेल्या व 1,000 हून अधिक ग्राहक आणि 100 रेस्टॉरंट्सचा सहभाग असलेल्या या सर्वेक्षणातून पारंपरिक भारतीय मिठाईंना स्पष्ट प्राधान्य मिळत असल्याचे अधोरेखित झाले आहे. सणांसाठी गोड पक्वानांच्या होणाऱ्या विक्रीमध्ये या मिठाईचा वाटा आता 55 टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तुलना केली असता एकूण विक्रीतील पाश्चात्य डिझर्टसचा वाटा 25 टक्के आहे तर उर्वरित 20 टक्क्यांमध्ये आइसक्रीम्स आणि चॉकलेट्सचा समावेश आहे. रसमलाई, गुलाब जामुन आणि रसमलाई तिरामिसूसारख्या नाविन्यपूर्ण फ्युजन डिझर्ट्सना विशेषत: HoReCa (हॉटेलिंग/रेस्टॉरंट/केटरिंग) क्षेत्रांतून सर्वाधिक पसंती मिळत आहे.
स्कॅण्डलस फूड्सच्या मते या वाढीला अऩेक घटक कारणीभूत आहेत, ज्यात अधिक आरोग्यपूर्ण, कल्पक डिझर्टच्या पर्यायांकडे वाढता कल आणि ग्राहक तसेच व्यावसायिक दोघांनाही आकर्षक वाटणारे मूल्यनिर्धारणाचे धोरण यांचा समावेश आहे.
या निष्कर्षांबद्दल बोलताना स्कॅण्डलस फूड्सचे सह-संस्थापक संकेत एस म्हणाले, “गोडाधोडाचं खायची हौस भागवण्याची वेळ येते तेव्हा भारतीय मिठाया जगभरातील मिष्टांन्नांना मागे टाकतात यात शंकाच नाही. भारतीय ग्राहकांच्या मनामध्ये विशेषत: सणासुदीच्या काळामध्ये आणि मिठायांचे एक खास स्थान आहे हे आमच्या नव्या सर्वेक्षणातूनही पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. आपल्या कार्यकक्षेचा विस्तार करताना आणि फ्युजन फूड्सच्या साथीने नव्या संकल्पना मांडत असताना, बाजारपेठेच्या बदलत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत व त्याचवेळी भारतीय मिठायांच्या समृद्ध परंपरेशी आपले इमानही राखून आहोत.”
पारंपरिक भारतीय मिठाई पुन्हा एकदा लोकप्रिय होण्यामागे हॉटेलिंग/रेस्टॉरंट/केटरिंग क्षेत्राची महत्त्वाची भूमिका असल्याचेही या सर्वेक्षणातून ठळकपणे दिसून आले. त्यातही विशेषकरून क्विक सर्व्हीस रेस्टॉरंट्स (QSRs) आणि क्लाउड किचन्समुळे मागणीला भर आला असून सणांसाठी भेटवस्तू म्हणून मिठाई देण्याच्या पद्धतीमुळे विक्रीतील वाढीमध्ये चांगलेच योगदान मिळाले आहे. त्याचबरोबर पारंपरिक आणि आधुनिक चवींना एकत्र आणणाऱ्या फ्युजन स्वीट्सच्या उदयातून पाककलेतील नव्या प्रयोगांना, विशेषत: युवा ग्राहकांकडून मिळणारी वाढती पसंती दिसून आली आहे.
सणांचा हा मोसम जसजसा बहरत जाईल तसतशी पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण मिठायांना सततची मागणी राहील अशी स्कॅण्डलस फूड्सची अपेक्षा आहे व पार लग्नसराईच्या दिवसांपर्यंत व त्यानंतरही या बाजारपेठेचा एका मोठ्या भागावर भारतीय मिठायांचेच वर्चस्व राहील असा अंदाज आहे.
स्कॅण्डलस फूड्सने गेल्या एका वर्षात आपले वितरण जाळे 400 वरून 1500 टचपॉइंट्सपर्यंत विस्तारल्यामुळेही विशेषत: सणासुदीच्या काळातील या लाडक्या मिठाईंची उपलब्धता आणि सहजप्राप्यता वाढण्यामध्ये मदत झाली आहे.