(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! एलॉन मस्क यांची भारत भेट लांबणीवर, करणार होते कोट्यवधीच्या गुंतवणुकीची घोषणा!
एलॉन मस्क हे भारताला भेट देणार होते. मात्र अचानकपणे त्यांचा हा भारतभेटीचा दौरा लांबणीवर पडला आहे. आपल्या या दौऱ्यादरम्यान मस्क महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता होती.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अब्जाधीश एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या भारत दौऱ्याची सगळीकडे चर्चा होती. ते येत्या 21 आणि 22 एप्रिल रोजी भारतात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यांनी आपला हा दौरा पुढे ढकलला आहे. याबाबतची माहिती खुद्द एलॉन मस्क (Elon Musk India Visit) यांनीच आपल्या एक्स खात्यावर दिली आहे. एलॉन मस्क यांचा भारत दौरा हा भारतासाठी अनेक अर्थांनी महत्त्वाचा होता. या वर्षी मी लवकरच भारत दौरा करेन, असं मस्क यांनी सांगितलं आहे.
मस्क करणार होते मोठी घोषणा
टेस्ला ही इलेक्ट्रॉनिक कारची निर्मिती करणारी कंपनी मस्क यांच्या मालकीची आहे. हीच कंपनी भारतात आपला प्लान्ट उभारू पाहात आहे. त्यासाठीची तयारीदेखील या कंपनीकडून केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी टेस्ला कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून प्लान्ट उभारणीसाठी जागेची चौकशी करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र अशी अनेक राज्ये या प्लान्टसाठी प्रयत्न करत आहेत. मस्क यांच्या या दौऱ्यादरम्यान, टेस्लाच्या या नव्या प्लान्टविषयी मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आता मस्क यांचा हा दौरा सध्यातरी स्थगित झाला आहे. लवकरत ते भारतात येणार आहेत, अशी माहिती खुद्द मस्क यांनी दिलीय.
25 हजार कोटी रुपयांची करणार गुंतवणूक
एलॉन मस्क हे भारतात 25 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यावर विचार करत आहेत. टेस्ला कारनिर्मितीचा प्लान्ट आणि सॅटेलाईट कम्यूनिकेशन या माध्यमातून ही गुंतवणूक होणार होती. एलॉन मस्क भारतात आल्यानंतर अंतराळ संशोधनावर काम करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनाही भेट देणार होते. मात्र आता मस्क यांनी आपला भारताचा दौरा लांबवला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या या संभाव्य गुंतवणुकीचे काय होणार? असे विचारले जात आहे.
एलॉन मस्क नेमकं काय म्हणाले?
एलॉन मस्क यांनी एक्सच्या माध्यमातून भारत दौरा लांबणीवर टाकण्यात आल्याचे सांगितले. दुर्दैवाने टेस्ला कंपनीतील जबाबदारीमुळे माझा भारताचा दौरा लांबणीवर पडत आहे. मात्र या वर्षात मी भारताच्या दौऱ्यावर नक्की येणार आहे. या दौऱ्यासाठी मी उत्सूक आहे, अशी माहिती मस्क यांनी एक्सच्या माध्यमातून दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 23 एप्रिल रोजी टेस्ला ही कंपनी तिमाहिचा निकाल जाहीर करणार आहे. तिमाही निकालाची ही तारीख पहिल्यापासूनच ठरलेली होती. याच काळात मस्क भारतात येणार होते. आता मात्र त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. ते या वर्षात भारतात येणार आहेत, हे स्पष्ट असले तरी त्यांचा हा दौरा नेमका कधी असेल, हे मात्र अद्याप अस्पष्ट आहे.
एलॉन मस्क भारतात येऊन नेमकं काय करणार होते?
एलॉन मस्क आपल्या भारत दौऱ्यावर 2 ते 3 अब्ज डॉलर्स म्हणजेच साधारण 25 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा करणार होते. या गुंतवणुकीच्या माध्यमातून एका मॅन्यूफॅक्चरिंग युनिटची उभारणी केली जाणार होती. यासह सॅटेलाईट कम्यूनिकेशनविषयीही मस्क निर्णय घेणार होते. आपल्या या दौऱ्यादरम्यान मस्क भारतातील स्टार्टअप्स तसेच अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करणार होते.
हेही वाचा :
तयारीला लागा! लवकरच येणार 'या' कंपनीचा आयपीओ, भरघोस पैसे कमवण्याची नामी संधी!
दागिने विकून गाय घेतली, आता मेहनतीच्या जोरावर झाली करोडपती; महिलेच्या जिद्दीला देशाचा सलाम!
नारायण आजोबांनी भेट दिलेल्या शेअरची कमाल, 5 महिन्यांच्या नातवाच्या संपत्तीत तब्बल 4.2 कोटींची वाढ