दागिने विकून गाय घेतली, आता मेहनतीच्या जोरावर झाली करोडपती; महिलेच्या जिद्दीला देशाचा सलाम!
एका महिलेच्या जिद्दीची आता सगळीकडे चर्चा चालू आहे. या महिलेने मेहनतीच्या जोरावर कोट्यवधीचं साम्राज्य उभं केलं आहे.
भुवनेश्वर : कठोर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर स्वप्न पूर्ण करता येतात. त्याची अनेक उदाहरणं तुम्ही याआधी पाहिली असतील. कधीकाळी पैशांच्या चणचणीमुळे अनेक संकटांना तोंड देणाऱ्या व्यक्ती आज कोट्यधीश झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. दरम्यान, सध्या अशाच एका जिगरबाज महिलेची सगळीकडे चर्चा होत आहे. या महिलेने जिद्दीने, हिमतीने, संकटांना तोंड देत स्वत:चा व्यवसाय उभा केला आहे. आज हीच महिला कोट्यधीश आहे.
कुटुंबाचा खर्च भागवणे झाले होते कठीण
संकटांना दोन हात करून स्वत:चा व्यवसाय उभारणाऱ्या या महिलेचे नाव नमिता पटजोशी असे आहे. त्या मुळच्या ओडिसा राज्यातील आहे. 1987 साली त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती ओडिसातील कोटपूट येथील महसूल विभागात क्लर्क होते. त्यांना तेव्हा प्रतिमहिना 800 रुपये पगार होता. या तोकड्या पगारावर सात जणांचं कुटंब चालवणं त्यांना फारच कठीण होऊन बसलं होतं. नवऱ्याला हातभार म्हणून त्यांनी 1997 साली दागिने गहाण ठेवून एक गाय खरेदी केली आणि दूधविक्रीचा व्यवसाय चालू केला. याच दूध व्यवसायाच्या जोरावर त्या कोट्यधीश झाल्या आहेत.
दागिने गहाण ठेवून खरेदी केली गाय
नमिता यांना त्यांच्या कुटुंबासाठी रोज दोन लीटर दूध लागायचे. त्यासाठी त्यांना रोज 20 रुपये खर्च करावे लागायचे. हे पैसे वाचावेत म्हणून 1995 साली नमिता यांच्या वडिलांनी त्यांना एक गाय भेट दिली. ही काय रोज चार लीटर दूध त्यायची. मात्र दुर्दैवाने त्यांची ही गाय अचानक गायब झाली. पुढे दोन वर्षांनी म्हणजेच 1997 साली त्यांनी 5,400 रुपयांची एक क्रॉस ब्रीड गाय खरेदी केली. या गाईच्या खरेदीसाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी स्वत:चे दागिने गहाण ठेवले. ही गाय प्रतिदिन सहा लीटर दूध द्यायची. सुरुवातीला त्या सहा लीटर दुधापैकी दोन लीटर दूध घरी ठेवायच्या आणि उरलेले चार लीटर दूध 10 रुपये प्रतिलीटर दराने लोकांना विकायच्या. त्यानंतर दूधविक्रीमुळे चांगला पैसा मिळू शकतो. कुटुंबाला हातभार लागू शकतो, याची कल्पना नमिता यांना आली.
अनेकांना रोजगार, कोट्यवधींची उलाढाल
नमिता यांनी आपला हा व्यवसाय वाढवण्याचे ठरवले. त्या हळूहळू आणखी गाई खरेदी करू लागल्या. 2015-16 साली त्यांनी 50 टक्के अनुदानाच्या मदतीने कर्ज घेतले आणि वेगवेगळ्या गाई खरेदी केल्या. त्यांच्याकडे आज जर्सी, सिंधी आणि होल्स्टीन जातीच्या साधारण 200 गाई आहेत. त्यांनी आता दूधविक्रीचा व्यवसाय उभारला आहे. नमिता यांनी खरेदी केलेल्या गाई आजघडीला रोज 600 लीटर दूध देतात. त्यांनी आता स्वत:चा कंचन डेअरी फार्म उभा केला आहे. त्यांनी आपल्या या व्यवसायाच्या माध्यमातून 18 आदिवासी महिलांसह एकूण 25 लोकांना रोजगार दिला आहे. त्या हे दूध 65 रुपये प्रतिलीटर (39,000 रोज) दराने विकतात. अतिरिक्त दुधापासून ते पनीर, दही आणि तुपाचीही निर्मिती करतात. त्यांच्या या व्यवसायातून वर्षभरात 1.5 कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यांच्या या यशाची सध्या देशभरात चर्चा होत आहे.
हेही वाचा :
नारायण आजोबांनी भेट दिलेल्या शेअरची कमाल, 5 महिन्यांच्या नातवाच्या संपत्तीत तब्बल 4.2 कोटींची वाढ!
मंदिरात गेला अन् दान केले तब्बल 5 कोटी, मुकेश अंबानींच्या मुलाच्या दानशूरतेची चर्चा!