TCS Updates: टीसीएसचे सीईओ-एमडी राजेश गोपीनाथन यांचा राजीनामा, कंपनीची धुरा कोणाकडे?
TCS CEO Resigns : TCS चे व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजेश गोपीनाथन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
TCS CEO Resigns : देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे (TCS) व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) राजेश गोपीनाथन यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने एक निवेदन जारी करून ही माहिती दिली आहे. राजेश गोपीनाथन यांच्या राजीनाम्यानंतर TCS ने 16 मार्च 2023 पासून नवीन CEO म्हणून क्रितिवासन यांची नियुक्ती जाहीर केली आहे.
क्रितिवासन हे कंपनीचे सध्या बँकिंग, वित्तीय सेवा आणि इन्शुरन्स बिझनेस ग्रुपचे ((BFSI) ग्लोबल हेड म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. क्रितिवासन हे मागील 34 वर्षांपासून टीसीएसमध्ये कार्यरत आहेत. राजेश गोपीनाथन हे 22 वर्ष टीसीएसमध्ये कार्यरत होते. त्यानंतर आता, त्यांनी राजीनामा दिला आहे. मागील सहा वर्षांपासून ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. राजेश गोपीनाथन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असला तरी सप्टेंबर महिन्यापर्यंत टीसीएसमध्ये कार्यरत असणार आहे.
TCS CEO Rajesh Gopinathan quits; co appoints K Krithivasan as CEO Designate with immediate effect: Statement
— Press Trust of India (@PTI_News) March 16, 2023
राजेश गोपीनाथन यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, टीसीएससोबतचा 22 वर्षांचा प्रवास अतिशय रोमांचकारी होता. एन. चंद्रशेखरन यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव अतिशय आनंददायी असल्याचे त्यांनी सांगितले. टीसीएसचे बाजार भांडवल 70 अब्ज डॉलरपेक्षा जास्त आहे. काही नवीन कल्पनांवर काम करत असून त्या कल्पनांना वेगळे करून पुढे नेण्याची 2023 ही योग्य वेळ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
क्रितिवासन यांच्यासोबत काम करताना आलेल्या अनुभवांबद्दल राजेश गोपीनाथन यांनी म्हणाले की, गेल्या दोन दशकांत क्रिथसोबत काम केल्यामुळे, मला विश्वास आहे की टीसीएसला नवीन उंचीवर नेण्यासाठी ते सक्षम आहेत. तो म्हणाला की तो क्रितिवासन यांच्यासोबत मिळून काम करणार असून त्यांना आवश्यक असणारी मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटले.
टीसीएसने आज शेअर बाजार नियामक प्राधिकरणाला राजेश गोपीनाथन यांच्या राजीनाम्याची माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या इतर काही वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिला असल्याची माहिती टीसीएसने दिली. TCS ने डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 11 टक्क्यांनी वाढ नोंदवला. टीसीएसचा नफा या तिमाहीत 10,846 कोटींवर पोहोचला आहे. मागील वर्षीच्या तिमाहीमध्ये ₹9,806 कोटी इतका नफा कमावला होता. कंपनी ऑपरेशन्समधून मिळणारा महसूल 58,229 कोटींवर आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा नफा 19 टक्क्यांनी जास्त आहे. आज, गुरुवारी, 16 मार्च रोजी मुंबई शेअर बाजारावर कंपनीचा शेअर 0.44 टक्क्यांनी घसरून 3,184.75 वर बंद झाला.