Success story : फक्त 2500 रुपयात व्यवसायाची सुरुवात, आज 50 कोटी रुपयांची उलाढाल, 8 राज्यात विस्तार
आज आपण अशाच एका युवकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या युवकाने फक्त 2500 रुपयांच्या गुंतवणुकीत व्यवसायाची सुरुवात केली होती. आज तो 50 कोटी रुपयांची उलाढाल करत आहे.
Success story : सध्याच्या युगात अनेकजण विविध व्यवसायाच्या माध्यमातून यशस्वी होताना दिसत आहेत. कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज आपण अशाच एका युवकाची यशोगाथा पाहणार आहोत. ज्या युवकाने फक्त 2500 रुपयांच्या गुंतवणुकीत व्यवसायाची सुरुवात केली होती. प्रमोद कुमार भदानी असं या युवकाचं नाव आहे. सध्या हा युवक 50 कोटी रुपयांची उलाढाल करत आहे.
बिहारच्या गया येथील रहिवासी प्रमोद कुमार भदानी हे लड्डू विक्रीच्या व्यवसायातून वार्षिक 50 कोटी रुपयांची उलाढाल करत आहेत. एकेकाळी त्यांनी 2500 रुपयांच्या गुंतवणुकीतून व्यवसायाची सुरुवात केली होती. काही काळातच त्यांच्या या छोट्या व्यवसायाचे रुपांतर करोडो रुपयांच्या व्यवसायात झालं आहे. जाणून घेऊयात प्रमोद कुमार भदानी यांची यशोगाथा.
गरिबीमुळे वयाच्या 14 व्या वर्षी शिक्षण सोडलं
प्रमोद यांचा जन्म एका सामान्य कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील मिठाई विकत होते. ते हातगाडीवर लाडू विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत असे. गरिबीमुळं प्रमोद यांना वयाच्या 14 व्या वर्षीच शिक्षण सोडावे लागलं होतं. वडिलांना त्यांच्या कामात मदत करत होते. पुढे जाण्यासाठी, प्रमोदने त्याच्या भावासह वडिलांकडून 2500 रुपये उसने घेतले आणि शहरात एका हातगाडीवर लाडू विकायला सुरुवात केली. प्रमोदचे लाडू लोकांना खूप आवडू लागले. हळूहळू प्रमोदचे ग्राहक वाढू लागले आणि त्याचा व्यवसायही वाढू लागला.
सुरुवातीला प्रमोदने केले 14 ते 15 तास काम
प्रमोदला आपला व्यवसाय वाढवायचा होता. यासाठी त्याने दिवसाचे 14 ते 15 तास काम सुरु केले. तो रात्रभर लाडू बनवायचा आणि दिवसा विकायचा. प्रमोदने हळूहळू आपला व्यवसाय एका छोट्या दुकानात सुरु केला. ज्यामुळं त्याच्या व्यवसायाला खूप गती मिळाली. त्याने बिहार तसेच झारखंड आणि शेजारच्या राज्यांमध्ये लाडूंचा पुरवठा सुरु केला. हळूहळू प्रमोदच्या व्यवसायाचे एका कारखान्यात रुपांतर झाले, जिथे मोठ्या प्रमाणावर लाडू बनवले जाऊ लागले.
देशातील विविध 8 राज्यांमध्ये व्यवासायाचा विस्तार
आज प्रमोदच्या प्रमोद लड्डू भंडारचा 8 राज्यात विस्तार झाला आहे. त्याची वार्षिक उलाढाल 50 कोटींवर पोहोचली आहे. आज लाडूसोबतच प्रमोद इतर मिठाई, स्नॅक्स आणि बेकरी उत्पादनेही विकत आहे. त्यामुळं प्रमोदची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत आहे. या व्यवसायात त्यांना चांगला नफा देखील मिळत आहे. कष्ट करण्याची तयारी असल्यावर कोणत्याही व्यवसायात यळ मिळतेच असा सल्ला त्यांनी नवीन व्यवसायात येणाऱ्या तरुणांना दिला आहे.