(Source: ECI/ABP News/ABP Majha)
T Plus 1 Settlement Cycle : शेअर्स विकल्यानंतर एकाच दिवसात अकाउंटमध्ये पैसे येणार, 25 फेब्रुवारीपासून नवा नियम लागू
T Plus 1 Settlement Cycle : आता शेअर्स विकल्यानंतर फक्त एका दिवसात पैसे खात्यात जमा होणार. ही नवी प्रणाली 25 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे.
T Plus 1 Settlement Cycle : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. शेअर विकल्यानंतर एका दिवसात खात्यात पैसे जमा होणार आहेत. 25 फेब्रुवारीपासून शेअर बाजारसंबंधी नवा नियम लागू होणार आहे. देशातील सर्व प्रमुख स्टॉक एक्स्चेंज आणि इतर मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर इंस्टिट्युशन्सनं काल (सोमवारी) शेअर बाजारातील सेटलमेंटसाठी T+1 सिस्टमची घोषणा केली आहे.
T+1 मध्ये, T चा अर्थ 'ट्रेडिंगचा दिवस'. T+1 प्रणाली लागू केल्यामुळे, शेअर्स विकल्यानंतर एका दिवसातच गुंतवणूकदारांच्या खात्यात पैसे जमा होतील. सध्या शेअर्सच्या सेटलमेंटसाठी T+2 प्रणाली लागू आहे. म्हणजेच, शेअर्सची विक्री किंवा ट्रेडिंग केल्यानंतर दोन दिवसांनी गुंतवणूकदाराच्या खात्यात पैसे येतात. T+1 प्रणाली लागू केल्यानंतर, गुंतवणूकदारांनी शेअर्सची विक्री केल्यानंतर त्यांना केवळ एकाच दिवसात पैसे मिळतील. एवढंच नाहीतर, T+1 प्रणालीमध्ये शेअर विकत घेतल्यानंतर डिमॅट अकाउंटमध्ये एकाच दिवसात जमा होणार आहे.
25 फेब्रुवारीपासून T+1 प्रणाली टप्प्याटप्प्यानं लागू करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बाजार भांडवलानुसार सर्वात कमी 100 कंपन्यांच्या शेअर्समध्ये ही प्रणाली लागू केली जाईल. त्यानंतर मार्च 2022 पासून या प्रणालीमध्ये आणखी 500 स्टॉक आणले जातील.
सर्व मार्केट इन्फ्रास्ट्रक्चर संस्थांनी (MIIs) संयुक्तपणे हा निर्णय घेतला आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. या MII मध्ये स्टॉक एक्सचेंज, क्लिअरिंग कॉर्पोरेशन आणि डिपॉझिटरीज समाविष्ट आहेत.
दरम्यान, यापूर्वी, बाजार नियामक SEBI नं एक्स्चेंजना 1 जानेवारी 2022 पासून इक्विटी विभागात उपलब्ध असलेल्या कोणत्याही सिक्युरिटीजसह T+1 प्रणाली लागू करण्याची परवानगी दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, स्टॉक एक्स्चेंज (BSE, NSE आणि MSEI) वरील सर्व सूचीबद्ध समभागांना घटत्या मार्केट कॅपनुसार, क्रमवारी लावली जाईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :