Share Market Updates: सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, अस्थिरतेचे संकेत
Share Market Updates: शेअर बाजारात सुरुवातीच्या घसरणीनंतर सेन्सेक्स, निफ्टी सावरला.
Share Market Updates: भारतीय शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज घसरणीसह झाली. सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकांत घसरण दिसून आली. मात्र, त्यानंतर बाजारात गुंतवणूकदारांकडून खरेदीचा जोर दिसून आला. त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांक वधारले. प्री-ओपनिंग सत्रातही घसरण नोंदवण्यात आली.
आज सकाळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 164.36 अंकांच्या घसरणीसह 61,708.63 वर खुला झाला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 5.15 अंकांच्या घसरणीसह 18,398.25 अंकांवर व्यवहार करत होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 13 शेअर्समध्ये तेजी दिसून आली. तर, 17 शेअर्समध्ये घसरण होती. निफ्टीत 21 कंपन्यांच्या शेअर दरात तेजीसह व्यवहार सुरू होता. तर, 29 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण नोंदवण्यात आली.
सकाळी झालेल्या घसरणीनंतर बाजारात तेजी दिसून आली. सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 80.97 अंकांनी वधारत 61,953.96 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 32.65 अंकांनी वधारत 18,436.05 अंकांवर व्यवहार करत होता. निफ्टीतील 24 कंपन्यांच्या शेअर दरात खरेदीचा जोर दिसला. तर, 25 कंपन्याच्या शेअर दरात विक्रीचा दबाव दिसून आला. एका कंपनीच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. सेन्सेक्समध्ये 18 कंपन्यांचे शेअर दर वधारले. तर, 12 कंपन्यांचे शेअर दर घसरले.
कोटक बँक, डॉ. रेड्डी लॅब, विप्रो, टीसीएस, इन्फोसिस, टाटा केमिकल्स, एचसीएल टेक, एल अॅण्ड टी, मारुती, एचडीएफसी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, नेस्ले, सन फार्मा कंपनीच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयटीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर, अॅक्सिस बँकेच्या शेअर दरात घसरण सुरू आहे.
बिकाजी फूड्स आणि ग्लोबल हेल्थची लिस्टिंग
शेअर बाजारात पडझड सुरू असताना दुसरीकडे आज दोन कंपन्यांची बाजारात लिस्टिंग झाली. मेदांता या ब्रॅण्ड अंतर्गत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालवणारी 'ग्लोबल हेल्थ' (Global Health) कंपनी आणि खाद्यपदार्थ तयार करणारी बिकाजी फूड्स इंटरनॅशनल (Bikaji Foods International) कंपनीने बुधवारी बाजारात दमदार एन्ट्री केली. शेअर बाजारात लिस्टिंग होताच या दोन कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. मुंबई शेअर बाजारात ग्लोबल हेल्थ 398.15 रुपयांवर सूचीबद्ध (Global Health Listing) झाला. तर, बिकाजी फूड्स 321.15 रुपयांवर (Bikaji Foods International Listing) सूचीबद्ध झाला.
मंगळवारी बाजार सावरला
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये (Sensex) मंगळवारी 248 अंकांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये (Nifty) 74 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्समध्ये 0.40 टक्क्यांची वाढ होऊन तो 61,872 अंकांवर स्थिरावला. तर निफ्टीमध्येही आज 0.40 टक्क्यांची वाढ होऊन तो 18,403 अंकांवर पोहोचला. निफ्टी बँकमध्ये मंगळवारी 295 अंकांची वाढ होऊन तो 42,372 अंकांवर पोहोचला.