(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Share Market : शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकदारांकडून विक्रीचा सपाटा; गुंतवणुकदारांचे 4 लाख कोटींचे नुकसान
Share Market Crash : परदेशी गुंतवणुकदारांनी शेअर्सची जोरदार विक्री केल्याने भारतीय शेअर बाजारात घसरण सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर आणि सीआरआर वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारतीय शेअर बाजारात विक्रीचा सपाटा सुरू असल्याचे चित्र आहे. विक्रीच्या या सपाट्यामुळे शेअर बाजारात घसरण सुरू आहे. जागतिक परिस्थिती आणि जागतिक शेअर बाजारात सुरू असलेली घसरण हे भारतीय शेअर बाजारातील घसरणीचे प्रमुक कारण आहे. परदेशी गुंतवणुकदार सातत्याने विक्री करत आहेत. त्यामुळे शेअर बाजारातील घसरणीमुळे रुपया डॉलरच्या तुलनेत नीचांकी पातळीवर आला असल्याचे म्हटले जात आहे.
गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान
आज शेअर बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स 647.37 अंक आणि निफ्टी 183.55 अंकानी घसरला होता. एका क्षणी सेन्सेक्स 935 अंकानी घसरला होता. त्यावेळी सेन्सेक्स 54 हजार अंकाखाली घसरला होता. तर, निफ्टीदेखील 270 अंकाखाली व्यवहार करत होता. त्यामुळे गुंतवणुकदारांचे मोठे नुकसान झाले. गुंतवणुकदारांचे चार लाख कोटींचे नुकसान झाले. बीएसईमध्ये नोंदणीकृत असलेल्या शेअरचे बाजार भांडवल मूल्य 3.75 लाख कोटींहून घटले आहे.
शेअर बाजारात घसरण का?
डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण झाली आहे. रुपयामध्ये आलेल्या घसरणीमुळे परदेशी गुंतवणुकदार शेअर बाजारातून आपले पैसे काढत असल्याचे म्हटले जात आहे.
परदेशी गुंतवणुकदार ( Foreign Portfolio Investors) भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. मे 2022 च्या पहिल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी जवळपास 6417 कोटी रुपये बाजारातून काढले आहेत. तर, 2022 मध्ये आतापर्यंत परदेशी गुंतवणुकदारांनी भारतीय शेअर बाजारातून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मागे घेतली आहे.
महागाईने वाढवली चिंता
सातत्याने वाढत जाणाऱ्या महागाईमुळे शेअर बाजाराची चिंता वाढवली आहे. एका बाजूला कर्ज महाग होत आहे. तर, दुसऱ्या बाजूला कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. महागाईमुळे कंपन्यांचा नफा कमी होऊ शकतो. येणारे तिमाही निकाल हे बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे येणार नसल्याचा अंदाज आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणुकदारांकडून विक्रीचा सपाटा सुरू असल्याची चर्चा आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: