Meesho च्या गुंतवणूकदारांना मोठा फटका, एका महिन्यात 40000 कोटी स्वाहा, सलग दुसऱ्या दिवशी लोअर सर्किट
Meesho : भारतीय शेअर बाजारात एका महिन्यापूर्वी लिस्ट झालेल्या मीशोच्या शेअरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी लोअर सर्किट लागलं. यामुळं गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालंय.

मुंबई: ई कॉमर्स प्लॅटफॉर्म मीशोच्या शेअरला सलग दुसऱ्या दिवशी लोअर सर्किट लागलं आहे. हा स्टॉक शेअर बाजारात लिस्ट झाल्यापासून चर्चेत आहे. आयपीओ लाँच झाल्यानंतर 2000 कोटींच्या स्टॉकचा लॉक इन कालावधी संपल्यानंतर मीशोच्या स्टॉकची विक्री काल झाल्याचं पाहायला मिळाल. दुसरं कारण म्हणजे कंपनीच्या जनरल मॅनेजर बिझनेस मेघा अग्रवाल यांनी राजीनामा दिला. मीशोनं हे फायलिंगमध्ये जाहीर केलं की जनरल मॅनेजर बिझनेस आणि सिनिअर मॅनेजमेंट मेघा अग्रवाल यांनी राजीनामा दिला आहे. बीएसईवर मीशोच्या शेअरला 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं आहे. मीशोचा शेअर 164.55 रुपयांच्या दरम्यान ट्रेड होत आहे. हा शेअर उच्चांकावरुन 35 टक्क्यांनी घसरल्यानं गुंतवणूकदारांचं 40 हजार कोटींचं नुकसान झालं आहे.
Meesho Share Down : मीशोच्या शेअरमध्ये घसरण
मीशोनं गेल्या महिन्यात 5421 कोटी रुपयांचा आयपीओ गेल्या महिन्यात आणला होता. गुंतवणूकदारांसाठी आयपीओचा किंमतपट्टा 111 रुपये ठेवण्यात आला होता. मीशोचा शेअर 76 टक्क्यांच्या प्रीमियमसह लिस्ट झाला होता. लिस्टींगनंतर काही दिवसात 18 डिसेंबरला शेअर 254.65 रुपयांवर पोहोचला होता. 12 डिसेंबरला शेअर 153.95 रुपयांवर होता.
नुवामा अल्टरनेटिव अँड क्वांटिटेटिव रिसर्चनुसार मीशोच्या 10.99 कोटी शेअरचा लॉक इन कालावधी संपला आहे. काल मीशोच्या स्टॉकला 5 टक्के लोअर सर्किट लागलं होतं. लॉक इन कालावधी संपल्यानंतर काही गुंतवणूकदार शेअरची विक्री नफावसुलीसाठी करतात. 6 जानेवारीला मीशोचा शेअरचा लॉक इन कालावधी संपला तेव्हा स्टॉक 182.30 रुपयांवर होता. त्यानुसार त्याचं मूल्य 2003 कोटी होतं.
बोनांझा रिसर्चचे विश्लेषक अभिनव तिवारी यांच्या मते गेल्या काही वर्षात मीशोनं त्यांच्या लॉजिस्टिक्समध्ये सुधारणा केली आहे. त्यांचा प्रतिऑर्डरचा खर्च 55 रुपयांवरुन 2025 मध्ये 46 रुपयांवर आला आहे.अभिनव तिवारी यांच्या मते मीशोनं त्यांचा लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्म वाल्मो तयार केल्यानं डिलिवरी डेन्सिटी सुधारली आहे. कॅश ऑन डिलिव्हरी 90 टक्क्यांवरुन कमी होऊन 61 टक्क्यांवर आली आहे. छोट्या शहरांमध्ये वाल्मोचा विस्तार वेगानं होत आहे.
दरम्यान, सेन्सेक्सवर आज देखील घसरणीचा ट्रेंड कायम आहे. पावणे बारा वाजेपर्यंत सेन्सेक्स 429 अंकांच्या घसरणीसह 84529.28 अंकांवर ट्रेड होत आहे. तर, निफ्टी 50 मध्ये 165.80 अंकांच्या घसरणीसह 25974.95 अंकांवर ट्रेड होत आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)























