(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दाट धुक्यातही विमानांचं लँडिंग होणार, मात्र मासिक खर्च 50 लाख; 'हे' तंत्रज्ञान ठरतेय उपयुक्त
आता दाट धुक्यातही (dense fog) सुरक्षीत विमानांचं लँडिंग (Safe Flight Landing) करता येणार आहे. दाट धुक्यात उड्डाणांचे सुरक्षित लँडिंग करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात आलं आहे.
Safe Flight Landing : अनेकदा धुक्यामुळं (fog) विमानाची उड्डाणे उशीराने होतात. काही वेळेला तर 10 तासाहून अधिक काळ विमानाची उड्डाणे लेट होतात. मात्र, आता दाट धुक्यातही (dense fog) सुरक्षीत विमानांचं लँडिंग (Safe Flight Landing) करता येणार आहे. दाट धुक्यात उड्डाणांचे सुरक्षित लँडिंग करण्यासाठी कॅट तंत्रज्ञान (CAT Technology) अत्यंत उपयुक्त ठरत आहे. जगातील अनेक देशांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसापूर्वी इंडिगो फ्लाइटचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. यामध्ये दाट धुक्यामुळं फ्लाइटला 10 ते 12 तास उशीर झाला होता. यावेळी संतप्त प्रवाशांपैकी एकाने केबिन क्रूवर हल्ला केला होता. विमानाचे उड्डाण होण्यास विलंब झाल्यानं काही प्रवाशी संतप्त होतात. त्यामुळं आता विमानांचे वेळेतच आणि सुरक्षित लँडिंग होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. जाणून घेऊयात या तंत्रज्ञानाबद्दल सविस्तर माहिती.
वैमानिकाला प्रशिक्षण देणं गरजेचं
दाट धुक्यात उड्डाणांचे सुरक्षित लँडिंग करण्यासाठी कॅट तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे. ही एक प्रकारची नेव्हिगेशन सिस्टीम आहे. जी धावपट्टीवर बसवलेल्या रडार सेन्सरद्वारे आणि विमानाशी संपर्क साधून काम करते. यामध्ये विमानाचा धावपट्टीच्या रडार यंत्रणेशी थेट संबंध असतो. ज्याद्वारे पायलटला विमान धावपट्टीवर उतरवण्याची, धावपट्टीची स्थिती आणि योग्य स्थितीत ठेवण्याची माहिती मिळते. मात्र, यासाठी वैमानिकाला प्रशिक्षण देणं अत्यंत गरजेचे आहे.
CAT-3 दिल्ली-कोलकाता येथे उपलब्ध
ज्या विमानतळांच्या धावपट्टीवर CAT-3 उपलब्ध नाही, त्याठिकाणी धुक्यात किंवा खूपच कमी दृश्यमानतेमध्ये विमान उतरवणे हे अवघड काम आहे. दिल्लीत ही सुविधा उपलब्ध असली तरी पण दिल्लीच्या हवाई वाहतुकीसाठी हे अपुरे आहे. CAT-3 तंत्रज्ञानाची क्षमता भारतात सर्वोत्तम आहे. हे दिल्लीच्या फक्त दोन धावपट्टीवर आहे. कोलकाता विमानतळावरही ही सुविधा उपलब्ध आहे. दिल्लीतील हवाई वाहतुकीमुळे अनेक वेळा विमान लखनौ, भोपाळ किंवा जयपूरला पाठवले जाते. CAT प्रणालीच्या अनेक श्रेणी आहेत.
CAT-1
सर्वसाधारण दृश्यमानता आठशे मीटरपेक्षा कमी नसावी आणि धावपट्टीची दृश्यमानता 550 मीटरपेक्षा कमी नसावी. उतरण्याचा निर्णय घेताना, उंची दोनशे फुटांपेक्षा कमी नसावी.
CAT-2
या धावपट्टीवरील दृश्यमानता 350 मीटरपेक्षा कमी नसावी. त्याचप्रमाणे, निर्णयाची उंची 100 फुटांपेक्षा कमी असू शकत नाही.
CAT-3
ही धावपट्टी सर्वोच्च श्रेणीत येते. त्याचे तंत्रज्ञान अतिशय उत्कृष्ट आहे. धुक्यात आणि अगदी कमी दृश्यमानतेतही यांवर उतरणे सोपे आहे. हे देखील तीन श्रेणींमध्ये विभागले गेले आहे. त्यांना अनुक्रमे CAT-3A, CAT-3B आणि CAT-3C म्हणतात. कुशल वैमानिक अशा धावपट्टीवर 50 मीटर दृश्यमानता असतानाही विमान सहजपणे उतरवू शकतात.
CAT-3 साठी वैमानिकांना विशेष प्रशिक्षण
CAT-3 ने सुसज्ज असलेल्या धावपट्टीसाठी वैमानिकांना विशेष प्रशिक्षण घ्यावे लागते. हे प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय मानकांनुसार आहे. त्याचे प्रमाणपत्रही उपलब्ध आहे. प्रशिक्षित वैमानिक केवळ धुके किंवा कमी दृश्यमानतेतच नाही तर वादळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानातही विमान कुशलतेने उतरवण्यास सक्षम असतात. असे वैमानिक ऑटो पायलट मोड, ग्राउंड इक्विपमेंट आणि इन्स्ट्रुमेंट लँडिंग पध्दतींद्वारे CAT-3 धावपट्टीवर विमान सक्षमपणे उतरवण्यास सक्षम असतात.
CAT-3 प्रणालीचा मासिक देखभाल खर्च 50 लाख
CAT-3 प्रणालीला धावपट्टीशी जोडण्यासाठी सुमारे 10 कोटी रुपये खर्च आला आहे. तर त्याच्या देखभालीचा खर्चही दरमहा 50 लाखांपर्यंत जातो. मात्र, हळूहळू ही यंत्रणा दिल्ली, कोलकाता आणि लखनऊ या दोन धावपट्टीसह देशातील अनेक प्रमुख विमानतळांवर बसवण्यात आली आहे.
CAT-3 धावपट्टीवर उतरण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी नियम काय ?
CAT-3 धावपट्टीवर उतरण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मुख्य वैमानिकाला किमान अडीच हजार तासांचा उड्डाणाचा अनुभव असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सहवैमानिकालाही पाचशे तासांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तीन तासांचे CAT-2 प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरच वैमानिकांना CAT-3 प्रशिक्षणासाठी पात्र मानले जाते. CAT-2 आणि CAT-3 च्या प्रशिक्षणासाठी, सर्व हवामान ऑपरेशन्सवर एक कोर्स आहे, जो पायलटला करावा लागतो. चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीनुसार, देशातील केवळ पाच टक्के वैमानिकांना कॅट-3 धावपट्टीसाठी प्रशिक्षण दिले जाते. जास्तीत जास्त वैमानिकांना त्याचे प्रशिक्षण घेणं गरजेचं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: