(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IndiGo Flight : इंडिगोच्या प्रवाशांवर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ, मुंबई विमानतळावरील VIDEO व्हायरल; नेमकं काय घडलं?
IndiGo Flight Passengers : गोव्याहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले. त्यानंतरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये प्रवासी विमानतळावर जमिनीवर बसूनच जेवताना दिसत आहेत.
IndiGo Flight Viral Video : सध्या सोशल मीडियावर (Social Media) विमान प्रवाशांचा (Flight Passengers) एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंडिगो (IndiGo) एअरलाईन्सचे (Airlines) प्रवासी विमानतळावर जमिनीवर बसूनच जेवताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या आहेत, तर अनेकांना प्रश्न पडला आहे की, हे नेमकं प्रकरण काय? दरम्यान, हा व्हिडीओ कसला आहे आणि नेमकी घटना काय याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.
इंडिगोच्या प्रवाशांवर जमिनीवर बसून जेवण्याची वेळ
गोव्याहून दिल्लीला जाणारे इंडिगोचे विमान ऑपरेशनल अडचणींमुळे मुंबईच्या दिशेने वळवण्यात आलं होतं. यानंतर मुंबई विमानतळावर प्रवासी जमिनीवर बसून जेवण करताना दिसले. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या सूत्रांकडून विमान वळवल्याच्या माहितीची पुष्टी केली आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय?
व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रात्रीची वेळ आहे, शेजारी इंडिगो एअरलाईन्सचे विमान उभे आहे आणि काही लोक विमाना जवळच जमिनीवर बसले आहेत. काहींच्या हातात फोन आहेत, काहीजण आपापसात बोलत आहेत तर काहींच्या जण जेवताना दिसत आहे. हा व्हिडीओ अनेक वेळा पोस्ट आणि रिशेअर करण्यात आलं आहे.
जयेश नावाच्या युजरने X वर विमान प्रवाशांचा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलं आहे की, 'इंडिगो गोवा-दिल्ली विमानाचे प्रवासी, जे फ्लाइटला 12 तास उशीर झाल्यानंतर मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले होते, ते इंडिगोच्या विमानाजवळच रात्रीचे जेवण करत होते.'
पाहा व्हायरल व्हिडीओ
passengers of IndiGo Goa-Delhi who after 12 hours delayed flight got diverted to Mumbai having dinner just next to indigo plane pic.twitter.com/jGL3N82LNS
— JΛYΣƧΉ (@baldwhiner) January 15, 2024
इंडिगोने माफी मागितली
ANI च्या माहितीनुसार, इंडिगोने प्रवाशांची माफी मागितलं आहे. या प्रकरणी इंडिगोने म्हटलं आहे की, "आम्हाला 14 जानेवारी रोजी गोवा ते दिल्ली येथे इंडिगो फ्लाइट 6E2195 च्या घटनेची माहिती आहे. दिल्लीत दृश्यमानता कमी असल्याने विमान मुंबईकडे वळवण्यात आलं. आम्ही आमच्या ग्राहकांची मनापासून माफी मागतो आणि सध्या या घटनेची चौकशी करत आहोत."
#ImportantAnnouncement pic.twitter.com/xyIb2PcRfr
— IndiGo (@IndiGo6E) January 15, 2024
डीजीसीएचे विमान कंपन्यांना निर्देश
सध्या देशात अनेक भागांत दाट धुक्याची चादर पसरली आहे. यामुळे दृष्यमानता कमी झाल्याने विमान वाहतुकीवर परिणाम होत असून प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, उड्डाण नियामक DGCA ने सर्व विमान कंपन्यांना धुक्यामुळे होणाऱ्या विलंबाबाबत अचूक रिअल-टाइम माहिती शेअर करण्यास सांगितलं आहे, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. DGCN ने एअरलाइन्सला विमानतळांवर वाट पाहणाऱ्या प्रवाशांना फ्लाइटच्या विलंबाबाबत अद्ययावत माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.