Repo Rate वाढवल्याने FADA ची नाराजी, ऑटोमोबाईल क्षेत्राला फटका बसणार असल्याचं मत
रेपो रेट वाढवल्याने वाहन कर्ज महागणार आहे. याचा फटका ऑटोमोबाईल क्षेत्राला बसणार असल्याचं फाडाचं मत आहे. महागणाऱ्या कर्जामुळे सर्वाधिक झळ टू व्हीलर सेगमेंटला सोसावी लागणार आहे.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल डीलर असोसिएशन अर्थात 'फाडा'कडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. रेपो रेट वाढवल्याने वाहन कर्ज महागणार आहे. परिणामी पुन्हा उभारी घेत असलेल्या ऑटोमोबाईल क्षेत्राला फटका बसणार असल्याचं फाडाचं मत आहे. महागणाऱ्या कर्जामुळे सर्वाधिक झळ टू व्हीलर सेगमेंटला सोसावी लागणार आहे. मागील आर्थिक वर्षात टू व्हीलर सेगमेंटची ग्रामीण भागातील कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. सोबतच वाढत्या किंमतींचा फटका आणि इंधनाच्या वाढत्या खर्चामुळे अनेकांनी टू व्हीलरकडे नाकं मुरडली. अशात वाहन कर्ज देखील महागली तर पुरवठ्यावर परिणाम होईल.
रेपो दरात वाढ
महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरबीआयकडून व्याज दरात वाढ करण्यात आली. रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. तर, कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये 0.50 टक्क्यांनी वाढवला आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी बुधवारी (4 मे) दुपारी पत्रकार परिषद घेत ही रेपो दरवाढीची माहिती दिली. जागतिक परिस्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने रेपो दर 0.40 टक्क्यांनी वाढवला आहे. याआधी एप्रिलमध्ये झालेल्या बैठकीत रेपो दर स्थिर होते. आता 6 ते 8 जून रोजी रिझर्व्ह बँकेची आढावा बैठक होणार आहे.
HDFC ने व्याजदरात 0.05 टक्क्यांनी वाढ केली
आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर काही तासांतच एचडीएफसीचे गृहकर्ज महाग झालं. खाजगी क्षेत्रातील या सर्वात मोठ्या बँकेच्या गृहकर्जावरील वाढीव व्याजदर 1 मे पासून लागू झाला आहे. HDFC ने रिटेल प्राइम लेंडिंग रेट (RPLR) 0.05% ने वाढवला आहे. हे नवीन दर 1 मे 2022 पासून लागू झाले आहेत. बँकेने स्पष्ट केले आहे की, अॅडजस्टेबल रेट होम लोन (ARHL) योजनेअंतर्गत गृहकर्जासाठी अर्ज करणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन व्याजदर 0.05% ने वाढेल आणि त्यांच्या व्याजाच्या रीसेट तारखेपासून लागू होईल.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरुपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरुपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
संबंधित बातम्या
- HDFC चे गृहकर्ज महागले, RBI ने रेपो दर वाढवल्याचा परिणाम
- Share Market Closing Bell : रेपो दर बदलाचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्स 1300 अंकानी कोसळला
- Repo Rate Hiked: कर्ज महागले, आरबीआयकडून रेपो दरात वाढ; शेअर बाजारात मोठी पडझड
- अमेरिकेतही महागाईचा फटका; फेडरल रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात वाढ, भारतीय शेअर बाजारावर परिणाम?