RBI on 2000 Note: मोठी बातमी! 2000 रुपयाच्या नोटा चलनातून बंद होणार, 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार
RBI on 2000 Note: 2000 रुपयांची नोट आता चलनातून बाद होणार आहे. आरबीआयने याबाबत निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत या नोटांची वैधता असणार आहे.
2000 Note: भारतीय रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने (RBI) बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले असल्याचे वृत्त 'पीटीआय'ने दिले आहे. 2018-19 मध्येच 2000 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी आहे.
RBI to withdraw Rs 2,000 currency notes from circulation; the notes will continue to be legal tender till September 30: Statement
— Press Trust of India (@PTI_News) May 19, 2023
₹2000 Denomination Banknotes – Withdrawal from Circulation; Will continue as Legal Tenderhttps://t.co/2jjqSeDkSk
— ReserveBankOfIndia (@RBI) May 19, 2023
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली आहे. मात्र, सध्या बाजारात असलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे. या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत.
नोटा कधीपासून बदलता येणार?
आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटा असलेल्या नागरिकांना बँकांमधून नोटा बदलण्याची सूचना केली आहे. बँकांमध्ये 23 मे पासून ही 2000 रुपयांची नोट बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. नागरिकांना 30 सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली आहे.
एका वेळी किती नोट बदलता येणार?
एकावेळी फक्त 2 हजार रुपयांच्या नोटा 20 हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदीनंतर 2000 हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.
मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही
2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही.
2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या वाढली
दरम्यान, संसदेत 1 ऑगस्ट 2022 रोजी दिलेल्या उत्तरात म्हटलं होतं की NCRB डेटानुसार, 2016 ते 2020 दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 वरुन 2,44,834 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार 2016 मध्ये देशात 2000 रुपयांच्या बनावट नोटांची संख्या 2,272 होती.