RBI Monetary Policy : रिव्हर्स रेपो रेट वाढवला जाण्याची शक्यता; रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीचा निर्णय आज
RBI Monetary Policy : RBIच्या पतधोरण आढावा समितीचा निर्णय आज जाहीर होणार आहे. रेपो रेट वाढवणार नसल्यानं व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार नसल्याचं बोललं जात आहे.
RBI Monetary Policy : रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीचा निर्णय आज जाहीर होणार आहे. रेपो रेट वाढवणार नसल्यानं व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी, त्यामुळे सामान्यांना दिलासा मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. रिव्हर्स रेपो रेट वाढवला जाण्याची शक्यता असून बॅंकांच्या हाती काही रक्कम राहू शकते अशी माहिती मिळाली आहे. महागाई दर आणि वाढत्या कच्च तेलाच्या किंमती पाहता, देशांतर्गत चलनवाढीच्या स्थितीबाबत मध्यवर्ती बॅंकेच्या आकलनाकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
भारतीय शेअर बाजार वधारला
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा समितीचा निर्णय आज जाहीर होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजार वधारला आहे. सेन्सेक्स 87 अंकांनी वधारला तर निफ्टीत 22 अंकांची भर पडली आहे. ओएनजीसी, पावर ग्रीड, इन्फोसिस, टाटा मोटर्स तेजी, तर बीपीसीएल, एशियन पेंट, आयसीआयसीआय बॅंक, कोल इंडिया आणि आयटीसीमध्ये बाजार उघडताच घसरण झाली आहे. जागतिक बाजाराचा देखील परिणाम भारतीय बाजारपेठांवर झाला आहे. अमेरीका, आशियाई आणि युरोपातली एक्सचेंज मार्केटमध्ये तेजी आहे.
सलग 9 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल
डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले होते. त्यावेळी सलग 9 व्यांदा व्याज दरात कोणताही बदल करण्यात आलेला नव्हता. रिझर्व्ह बँकेने मॉनिटरी पॉलिसीमध्ये कोणताही बदल केलेला नव्हता. रेपो रेट 4 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला होता. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी सांगितले होते की, आर्थिक वर्ष 2021-22 च्या पहिल्या सहामाहीत जीडीपी हा 13.7 टक्क्यांनी वाढला. महागाई दरदेखील चार टक्क्यांच्या आसपास राहिला असल्याचे त्यांनी सांगितले होते.
रेपो रेट म्हणजे काय?
रेपो रेट म्हणजे ज्या दराने बँका रिझर्व बँकेकडून पैसे घेते तो दर. रेपो रेट वाढणं म्हणजे बँकांना रिझर्व बँकेकडून मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणं, तर रेपो रेट कमी होणं म्हणजे बँकेला स्वस्तात पैसे मिळणं. म्हणजेच आरबीआयने रेपो रेट वाढवला तर पर्यायाने सर्व बँकांना ग्राहकांना द्यावयाची कर्जाचे दरही वाढवावे लागतात. तर कमी झाल्याने व्याज दर कमी होतो.
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय?
रिव्हर्स रेपो रेट म्हणजे रेपो रेटच्या अगदी उलट संकल्पना आहे. बँका रिझर्व बँकेकडून कर्जरूपी पैसा घेतात, तसाच रिझर्व बँकही या वेगवेगळ्या बँकाकडून कर्जरूपाने पैसे घेत असते. तेव्हा त्यासाठी जो दर आकारला जातो, त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- 2000 रुपयांच्या नोटा मार्केटमधून कमी झाल्या? केंद्रानं संसदेत सांगितलं 'हे' कारण
- महागाईचा भडका उडणार? आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किंमतीत वाढ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha