विकृतीचा कळस! दुकानासमोर बसलेल्या कुत्र्यावर सपासप 18 वार, मृतदेह फरफटत रस्त्यावर आणला, सीसीटीव्हीत घटना कैद
ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली असून दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.

Pune Crime: पुण्यातील पिंपरी चिंचवड शहर हादरवून सोडणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आकुर्डी येथील डी टू सी कमर्शियल दुकानासमोर बसलेल्या एका सायबेरियन हस्की जातीच्या कुत्र्याला दगडाने व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत त्याची एका अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली असून दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला आहे.
नेमकं घडलं काय ?
पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी येथे डी टू सी कमर्शियल दुकानासमोर बसलेल्या कुत्र्याला आरोपीने अचानक लक्ष्य केले. सुरुवातीला त्याने दगडाने वार केले. नंतर लाकडी दांडक्याने एकामागून एक जोरदार प्रहार करून कुत्र्याला गंभीर जखमी केले. एवढ्यावरच न थांबता आरोपीने मृतावस्थेतील कुत्र्याला फरफडत रस्त्यावर आणले. या अमानुष कृत्याचे दृश्य पाहून नागरिक व प्राणीप्रेमी स्तब्ध झाले आहेत.
घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. प्राणीप्रेमींनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. दुकानाच्या मालकाने तातडीने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहिता कलम 325, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 मधील कलम 11(1) आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्हीत घटना कैद
निगडी पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. आरोपी कोण आहे, त्याचे हेतू काय होते, आणि त्याने असा अमानुष प्रकार का केला, याबाबत अद्याप निश्चित माहिती समोर आलेली नाही. पोलिसांच्या तपासानंतर यामागील कारण स्पष्ट होईल. दरम्यान, सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. प्राणीप्रेमी संघटनांनी पोलिस प्रशासनाकडे आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
पतीने पत्नीचे केली निर्घृण हत्या
बीडच्या परळीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील डाबी येथे पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत तिची हत्या केली. हा प्रकार मध्यरात्री घडला परंतु सकाळपर्यंत याबाबत कोणालाही माहिती नव्हती.सकाळी घरातील मुले उठल्यानंतर ही बाब समोर आली. शोभा मुंडे असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे तर आरोपी तिचा पती तुकाराम मुंडे हा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.























