पाकिस्तानविरुद्ध सामन्याचा ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर एल्गार, महिलांसह शिवसैनिक रस्त्यावर; संजय राऊत म्हणाले, जे क्लब किंवा रेस्टाँरंट पडद्यावर दाखवतील त्या ठिकाणांची माहिती द्या
ज्यामध्ये मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे दिल्लीमध्ये शिवसेनेला आंदोलन करण्यास प्रतिबंध करण्यात आला.

Thackeray Shiv Sena agitation match against Pakistan: आशिया कपमध्ये दुबईमध्ये होत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला शिवसेना ठाकरे गटाकडून कडाडून विरोध करण्यात आला. आज (14 सप्टेंबर) राज्यामध्ये सर्वच ठिकाणी शिवसेनेने ठाकरे गटाकडून जोरदार आंदोलन करण्यात आले. माझं कुकूं माझा देश आंदोलन शिवसैनिक महिला आघाडीकडून करण्यात आलं. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिलांसह शिवसैनिक रस्त्यावर उतरले. नाशिकमध्ये मनसेकडून सुद्धा आंदोलन करण्यात आलं. मनसेकडून टीव्ही फोडून आंदोलन करण्यात आले. महिला आघाडीकडून मोदींना सिंदूर सुद्धा पाठवण्यात आलं. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं. सरकारकडून अजूनही सांगण्यात येते की ही मोहीम सुरूच आहे, तर पाक विरोधात सामना कशाला? अशी विचारणा करत शिवसेनेने पाकिस्तान विरुद्ध सामन्याला विरोध केला. त्यामुळे आज शिवसेनेकडून राज्यभर आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दुसरीकडे दिल्लीमध्ये शिवसेनेला आंदोलन करण्यास प्रतिबंध करण्यात आला. त्यांना आंदोलनाची परवानगी देण्यात आली नाही. राज्यामध्ये मुंबईसह पुणे, नाशिक, कोल्हापूर छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून जोरदार आंदोलन करण्यात आले.
मुंबईच्या वानखडे आणि मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिस बंदोबस्त
दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मुंबई क्लब आणि रेस्टॉरंटवाल्यांना सुद्धा गर्मीत इशारा दिला आहे. ज्या ठिकाणी क्लब आणि रेस्टॉरंटमध्ये स्क्रीनवर मॅच दाखवली जाईल त्या ठिकाणांची माहिती राष्ट्रभक्तांनी सोशल मीडियावर द्यावी असा गर्भित इशारा दिला आहे. दुसरीकडे अनिल परब यांनी सुद्धा मुंबईमध्ये जर स्क्रीनवर मॅच दाखवली गेली तर शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला आहे. शिवसेने इशाऱ्यानंतर मुंबईच्या वानखडे आणि मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी वानखेडे स्टेडियम परिसरात मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढवला आहे. वानखेडे स्टेडियमच्या सर्व गेट्सवर पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला आहे. विशेषत: पॉली उंबरीकर गेट या महत्त्वाच्या प्रवेशद्वारावर बॅरिकेडिंग लावून सुरक्षा कडक करण्यात आली आहे. दरम्यान, संपूर्ण मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून, कार्यकर्त्यांकडून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत नजर ठेवण्यात येत आहे.
जय शाह यांचा भारतीय संघावर दबाव
दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या सामन्यासाठी आयसीसी अध्यक्ष जय शाह यांचा भारतीय संघावर दबाव होता, असा गंभीर आरोप केला. संजय राऊत म्हणाले की हा सामना खेळण्यासाठी भारतीय संघातील खेळाडू सुद्धा इच्छुक नाहीत. मात्र, तरीही हा सामना होत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी केला. दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये मिलिंद नार्वेकर यांचा सहभाग असल्याने भाजपकडून त्यांना सवाल करण्यात आला. मिलिंद नार्वेकर यांनी याबाबत मोदींना अंधारात ठेवण्यात आल्याचे सांगत भाजपला प्रत्युत्तर दिलं.
पुण्यात महिला आघाडी रस्त्यावर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ महिला आघाडी यांनी गोखलेनगर शाळेच्या मैदानात केंद्र सरकार हाय हाय, मोदी सरकार हाय हाय, पाकिस्तान हाय हाय... शिवसेना झिंदाबाद, जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा देत क्रिकेट खेळून सरकारचा निषेध केला.पहलगाममध्ये झालेल्या घटनेच्या जखमा अजूनही ताज्या असताना एवढे क्रिकेट प्रेम दाखवणाऱ्या मोदी सरकारचे देशाला प्रगती नाही तर अधोगतीकडे नेत आहे. असा आरोप उपस्थित महिलांनी केला.
भारत पाकिस्तान सामन्याविरोधात मनसेचं आंदोलन
नाशिकमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांकडून टीव्ही फोडो आंदोलन करण्यात आले. यावेळी टीव्ही फोडून सरकारचा निषेध करण्यात आला. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत सामना खेळू नका, अशी मागणी मनसेकडून करण्यात आली. मनसे कार्यकर्त्यांकडून पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. ठाकरेंच्या शिवसेनापाठोपाठ मनसेकडून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.
भिवंडीत माझा देश, माझं कुंकू आंदोलन
भिवंडी शहरात शिवसेना महिला आघाडीच्या लोकसभा संपर्कप्रमुखआशाताई रसाळ, उपनेते विश्वास स्थळे, भिवंडी महिला जिल्हा संघटिका वैशाली मिस्त्री यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी उग्र निदर्शने करण्यात आली. यावेळी सर्व महिलांनी कुंकवाची डबी पेटीमध्ये एकत्रित करून आपला संताप व्यक्त केला. ही कुंकवाची पेटी मोदी यांना पाठवण्यात आली.
कोल्हापुरात अंबाबाई मंदिर परिसरात आरती
कोल्हापुरात भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले. ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. अंबाबाई मंदिर परिसरात आरती करून केंद्र सरकारला सद्बुद्धी यावी, असं साकडं घालण्यात आलं.
छत्रपती संभाजी नगरमध्ये आंदोलन
भारत पाकिस्तान सामन्याला ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजी नगरमध्येही विरोध करण्यात आला. हातात सिंदूर घेऊन महिला आघाडीकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सरकारचं हिंदुत्व खोटं आहे त्यांचा हा दुटप्पीपणा आहे, भाजपचे हेच का हिंदुत्व? असा सवाल अंबादास दानवे यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाला दिल्लीत आंदोलन करण्यावर प्रतिबंध
दुसरीकडे, शिवसेना ठाकरे गटाला दिल्लीत आंदोलन करण्यावर प्रतिबंध करण्यात आला. भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याविरोधात निदर्शने करण्यात येणार होती. तथापि, शिवसेना ठाकरेंच्या दिल्लीचे नेते मंगत राम मुंडे यांना दिल्ली पोलिसांकडून घरातून बाहेर पडण्यास प्रतिबंध करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
महत्त्वाच्या बातम्या






















