2000 रुपयांच्या नोटा मार्केटमधून कमी झाल्या? केंद्रानं संसदेत सांगितलं 'हे' कारण
2016 साली मोदी सरकारनं जुन्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करुन नवीन नोटा बाजारात आणल्या. आता मार्केटमधून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचं चित्र आहे. याला केंद्र सरकारनं देखील दुजोरा दिला आहे
नवी दिल्ली : 2016 साली मोदी सरकारनं जुन्या एक हजार आणि पाचशेच्या नोटा बंद करुन नवीन दोन हजार, पाचशे आणि दोनशेच्या नोटा बाजारात आणल्या. मात्र आता मार्केटमधून दोन हजार रुपयांच्या नोटा गायब झाल्याचं चित्र आहे. याला केंद्र सरकारनं देखील दुजोरा दिला आहे. 2000 रुपयांच्या नोटांची संख्या कमी होऊन 223.3 कोटी (नोटांची संख्या) इतकी झाली आहे. मार्च 2018 मध्ये 2000 रुपयांच्या 336.3 कोटी नोट सर्कुलेशनमध्ये होत्या.
अर्थ राज्य मंत्री पंकज चौधरी (Pankaj Chaudhary) यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, विशेष मूल्यवर्गांमध्ये बँकांच्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय सरकारकडून रिझर्व बँकेच्या सल्ल्यानं घेतला जातो. याचा उद्देश असा असतो की, व्यवहारामध्ये देवाणघेवाण सुविधाजनक बनवली जावी.
त्यांनी सांगितलं आहे की, 31 मार्च 2018 रोजी 2,000 रुपयांच्या 336.3 कोटी नोटा व्यवहारात होत्या. तर 26 नोव्हेंबर 2021 रोजी ही संख्या 2,23.3 कोटी नोटा इतकी होती.
चौधरी यांनी सांगितलं की, 2018-19 पासून नोटांसाठी करंसी प्रिंटिंग प्रेसकडे कुठलंही मागणी पत्र ठेवलं गेलेलं नाही. त्यांनी सांगितलं की, नोटाबंदीनंतर जारी करण्यात आलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांच्या व्यवहारात घट झाली आहे कारण 2018-19 पासून या नोटांच्या छपाईसाठी मागणी पत्र आलेलं नाही. सोबतच अनेक नोट खराब देखील झाल्या आहेत.
प्रत्येकवर्षी कमी होत गेली छपाई
2016 मध्ये 2000 च्या नोटा चलनात आल्यापासूनच या नोटा छापणं कमी होत गेलं. आरबीआयच्या मते आर्थिक वर्ष 2016-17 मध्ये 354 करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या होत्या. त्यानंतर आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 11.15 करोड दोन हजारच्या नोटा छापल्या गेल्या. तर 2018-19 मध्ये 4.669 करोड दोन हजाराच्या नोटा छापल्या गेल्या आहेत.
महत्वाची माहिती
2,000 रुपयांच्या नोटांची संख्या कमी होऊन ती 223.3 कोटी (नोटांची संख्या)
एकूण नोटांची टक्केवारी 1.75 टक्के
ही संख्या मार्च 2018 मध्ये 336.3 कोटी इतकी होती.