BLOG: मराठी चित्रपटसृष्टी – आपल्याच पायावर दगड मारून घेणारी इंडस्ट्री!

मराठी चित्रपटसृष्टीत एक जुना बहाणा कायम ऐकायला मिळतो.. “स्क्रीन मिळत नाहीत, हॉल मिळत नाहीत, प्रेक्षकांपर्यंत पोहोचत नाही.” मग, निर्मात्यांकडून माध्यमांमध्ये ओरड सुरु होते.. हिंदीमुळे मराठी चित्रपट मरतोय.. इंडस्ट्री धोक्यात आलीय.. असा आरोप सुरु होतो...
काही निर्माते मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं शिवतीर्थ गाठतात.. आपली कैफिएत मांडतात.. राज ठाकरेही मराठी चित्रपटांना स्क्रीन मिळावे म्हणून पुरेपूर प्रयत्न करत.. मराठी चित्रपटाला स्क्रीन्स मिळावेत म्हणून आग्रही राहतात.. प्रयत्न करतात.. वेळ प्रसंगी आंदोलनाचाही इशारा देतात.. गरज पडली तर आंदोलनही करतात..
पण, खरंच, प्रत्येकवेळी फक्त हिंदी चित्रपटांमुळेच मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाहीत? तर तसं नाहीय.. काऱण, काही वेळा निर्मात्यांच्या डोक्यातल्या गोंधळही कारणीभूत ठरतो... कसा.. त्यांचंच सर्वोत्तम उदाहरण... देणारा हा विकेंड...
12 सप्टेंबरचा शुक्रवार.. मराठी इंडस्ट्रीसाठी पुन्हा एकादा आपल्याच पायावर दगड मारून घेणारा ठरु शकतो.. कारण, बारा तारखेला.. आत्मघातकी भिडंत होणारय..
12 सप्टेंबर 2025 रोजी तीन मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत
1. दशावतार – दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव यांची दमदार तिकडी. कोकणातील लोकेशन्स, व्हिज्युअल इफेक्ट्सवर खर्च केलेलं कोट्यवधीचं बजेट, आणि पौराणिक गाभ्याशी जोडलेलं कथानक. मराठीत क्वचित दिसणाऱ्या भव्यतेचं हे उदाहरण.
2. बिनलग्नाची गोष्ट – उमेश कामत–प्रिया बापट ही सुपरहिट जोडी तब्बल 12 वर्षांनी मोठ्या पडद्यावर. प्रेक्षकांची भावनिक ओढ असलेला चित्रपट.
3. आरपार – ललित प्रभाकर–हृता दुर्गुळे या तरुणाईच्या लाडक्या जोडीचा रोमान्टिक ड्रामा.
तिन्ही सिनेमे ताकदीचे. पण एकाच दिवशी भिडवून त्यांची वाताहत करायची – हा नेमका कोणता शहाणपणा? दशावतारसारखा महत्त्वाकांक्षी चित्रपटही अशा गोंधळात अडकून बॉक्स ऑफिसवर गारठण्याचा धोका आहे.
बरं, फक्त हाच नाही तर पुढच्या आठवड्यातही असा गोंधळ आहे.. 19 सप्टेंबरला पुन्हा चार मराठी चित्रपट एकदम पडद्यावर येणार आहेत.
त्यात मोहन आगाशे, रोहिणी हट्टंगडी यांच्यासह सिद्धार्थ जाधवचा 'आतली बातमी फुटली' चित्रपट आहे. त्याच्या जोडीला 'अरण्य, कुर्ला टू वेंगुर्ला आणि सबर बोंड' असे आणखी तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. शिवाय 19 तारखेलाच अक्षय कुमार, अर्शद वारसी आणि सौरभ शुक्ला यांचा जॉली एलएलबी 3 आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बायोपिकही धडकणारय... मग प्रश्न पडतो – प्रेक्षकांची पसंती नेमकी कोणत्या मराठी चित्रपटाला मिळणार? आणि इतक्या गर्दीत त्यांना स्क्रीन कोण देणार?
खरंतर एकाच दिवशी दोन मोठे चित्रपट आले तर ते चालत नाहीत.. किंवा बॉक्स ऑफिसवर पडतात असंही नाही.. कारण, 1 मे 2025 ला प्रदर्शित झालेले दोन चित्रपट... पहिला होता भरत जाधव, अशुतोष गोवारीकर, ओम भूतकरचा... आता थांबायचं नाय.. आणि दुसरा होता गुलकंद.. ज्यात प्रसाद ओक, सई ताम्हणकर, समीर चौघुले यांच्यासह हास्यजत्राची टीम दिसली.. दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या धाटणीचे.. कथानकंही अतिशय वेगवेगळे.. दोन्ही चित्रपटांनी पाच कोटींपेक्षा जास्त गल्ला जमवला.. त्यांच्यावेळीही स्क्रीनसाठी संघर्ष दिसलाच.. पण, फिल्म दमदार... तर बॉक्स ऑफिसवर गल्ला भरणार...
बरं, चित्रपट क्लॅश होणं.. हे काही फक्त मराठीतच होतं असं नाही.. मात्र, अनेक निर्माते मोठ्या चित्रपटांचे क्लॅश टाळण्याचा प्रयत्न करतात.. हिंदीत अनेकदा मोठे स्टार्स स्वतःहून तारखा पुढे ढकलतात. आता कालपरवाच आलेला सिद्धार्थ आणि जान्हवी कपूरचा परम-सुंदरी चित्रपट निर्मात्यांनी असाच एक क्लॅश टाळण्यासाठी प्रदर्शन पुढे ढकललं..अक्षय कुमार आणि अजय देवगण यांनीही अनेकवेळा असे क्लॅश टाळल्याचंही उदाहरणं आहेत.. दक्षिणेतही मोठे स्टार्स शक्यतो बॉक्सऑफिसवर भिडत नाहीत. कारण त्यांना ठाऊक आहे – प्रेक्षकांना गोंधळात पाडणं म्हणजे स्वतःच्या सिनेमाचं नुकसान....
मराठीत मात्र संवाद नाही, शहाणपण नाही
मराठी निर्माते एकमेकांशी बोलत नाहीत, तारखा ठरवत नाहीत. आणि मग दोष कायम “स्क्रीन मिळत नाहीत” या बिनडोक कारणावर ढकलतात. खरं सांगायचं तर, मराठी चित्रपटसृष्टीला नाशाला नेणारं एकच कारण आहे – उद्योगातल्या लोकांची परस्परांशी असलेली बेफिकिरी.

























