डोळे नाहीत, दिसत नाही, शिक्षणासाठी खाल्ल्या खस्ता; आज उभी केली 500 कोटींची कंपनी; कोण आहेत श्रीकांत बोला?
राजकुमार रावच्या श्रीकांत या चित्रपटामुळे सध्या कोटवधी रुपयांचा मालक असलेल्या एका दृष्टीहीन उद्योगपतीची सगळीकडे चर्चा होत आहे.
मुंबई : सध्या अभिनेता राजकुमार रावच्या (Rajkummar Rao) श्रीकांत (Shrikant Film) या चित्रपटाची फार चर्चा होत आहे. एका अधं उद्योजगाची कहाणी या चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्यात आली आहे. या चित्रपटातील श्रीकांत यांना पाहून आता हा चित्रपट ज्यांच्या प्रेरणेने तयार करण्यात आला, त्याच श्रीकांत बोला (Srikanth Bolla) यांची चर्चा होत आहे. डोळ्यांनी दिसत नसलं तरीही त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर स्वत:ची तब्बल 500 कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे. त्यांनी शिक्षणासाठी थेट भारत सरकारला कोर्टात खेचलं होतं.
कोण आहेत श्रीकांत बोला? (Who is Srikanth Bolla)
श्रीकांत बोला हे मूळचे आंध्र प्रदेशचे राहिवासी आहेत. त्यांचा 1991 साली मछलीपट्टनम येथे जन्म झाला. त्यांना जन्मताच दृष्टी नाही. म्हणजेच ते डोळ्यांनी पाहू शकत नाहीत. डोळ्या नसल्यामुळे श्रीकांत यांना लहाणपणीच मारून टाकण्यासा सल्ला देण्यात आला. पण त्यांच्या आईवडिलांनी न ऐकता श्रीकांत यांना वाढवलं. त्यांनीदेखील पुढे जिद्दीने शिक्षण घेतलं. दिसत नसल्यामुळे ते लहानपणी आपल्या भावांच्या मदतीने शाळेत जात. शाळेतही त्यांनी नेहमी शेवटच्या बाकड्यावरच जागा मिळायची. त्यांना हे सर्वकाही पाहून फार वाईट वाटायचं. सततच्या अवहेलनेमुळे त्यांनी एकदा शाळा सोडून देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र शिक्षणाच्या माध्यमातूनच तुझे आयुष्य बदलू शकते, असे वडिलांनी सांगितल्यावर श्रीकांत यांनी नंतर कधी मागे पाहिले नाही. त्यांनी जिद्दीने शिक्षण घेतलं.
शिक्षणासाठी केला मोठा संघर्ष, पण हार मानली नाही
श्रीकांत यांना अंध मुलांच्या शाळेत टाकण्यात आले. ही शाळा त्यांच्या घरापासून साधारण 400 किमी दूर होती. त्यामुळे त्यांनी हैदराबादमध्ये जावं लागलं. त्यांनी हार न मानता मन लावून अभ्यास केला. परिणामी त्यांनी इयत्ता 10वीमध्ये 96 टक्के तर 12 वीमध्ये तब्बल 98 टक्के मार्क्स मिळाले. याच गुणांच्या जोरावर त्यांनी पुढचे शिक्षण विज्ञान शाखेत करण्याचे ठरवले. मात्र त्यांना वेगवेगळ्या महाविद्यालयांनी प्रवेश देण्यास नकार दिला. मात्र मी विज्ञान याच शाखेतून पुढचे शिक्षण घेणार, असा निश्चय त्यांनी केला होता. त्या काळात अंध विद्यार्थ्यांसाठी विज्ञान शाखेतून शिक्षण घेण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे त्यांनी जिद्दीला पेटून थेट सरकारला कोर्टात खेचलं. हा खटला साधारण सहा महिने चालला. विशेष म्हणजे या खटल्यात श्रीकांत यांचा विजयही झाला. परिणामी त्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात आला. ते विज्ञान शाखेतून अभ्यास करणारे पहिले दृष्टीहीन विद्यार्थी आहेत. तेव्हा दृष्टीहीन मुलांसाठी विज्ञान शाखेतील पुस्तकं नव्हती. यावरही त्यांनी तोडगा काढला. विज्ञान शाखेच्या पुस्तकांचे ऑडिओ व्हर्जन तयार करून ते अभ्यास करू लागले.
उच्चशिक्षणासाठी थेट अमेरिकेत
त्यांना आयआयटीतून उच्चशिक्षण घ्यायचं होतं पण त्यांचा अर्ज वेळोवेळी फेटाळण्यात आला. पुढे मात्र त्यांनी उच्चशिक्षणासाठी थेट अमेरिका गाठलं. त्यांना अमेरिकेतील MIT (Massachusetts Institute of Technology) कॉलेजमध्ये प्रवेशासाठी स्कॉलरशीप मिळाली होती. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना अनेक ठिकाणाहून नोकरीच्या ऑफर्स आल्या. मात्र त्यांनी नोकरीची ऑफर नाकारात भारत देश गाठला.
उभारली 483 कोटींची कंपनी
भारतात आल्यानंतर त्यांनी स्वत:चा उद्योग उभारला. त्यांनी 2012 साली बोलेंट इंडस्ट्रिज नावाने कंपनी चालू केली. या कंपनीकडून इको-फ्रेंडली उत्पादनांची निर्मिती केली जाते. या कंपनीचे सध्याचे बाजारभांडवल सध्या 483 कोटी रुपये आहे. त्यांच्या कंपनीत काम करणारे 70 टक्के कर्मचारी हे दिव्यांग आहेत. त्यांच्या या कंपनीत थेट रतन टाटा यांनी गुंतवणूक केलेली आहे. या कंपनीचे सध्या एकूण सात प्लान्ट आहेत. त्यांच्या कामाची दखल माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनीदेखील घेतलेली आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाकडे पाहून आज अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
हेही वाचा :
हिऱ्याच्या आकाराचा आलिशान बंगला, महागड्या गाड्या, शेतकरीपुत्र हजारो कोटींचा मालक कसा झाला?
सोन्याचा दर कमी होईना! 'या' कारणामुळे लवकरच होणार 1 लाख रुपये तोळा!