Rafael Nadal : राफेल नदालचे आता भारतीय कनेक्शन; 'या' कंपनीसोबत ब्रॅण्ड अॅम्बेसिडर म्हणून करारबद्ध
Rafael Nadal : टेनिस स्टार राफेल नदाल हा भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसशी जोडला गेला आहे.
मुंबई : जगातील दिग्गज टेनिस स्टार राफेल नदाल (Rafael Nadal) आता भारताशी अप्रत्यक्षपणे जोडला जाणार आहे. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील नावाजलेल्या कंपनीपैकी एक असलेली इन्फोसिस या कंपनीचा राफेल नदाल हा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर झाला आहे. राफेल नदालसोबत इन्फोसिसने तीन वर्षांसाठीचा करार केला आहे. इन्फोसिसने शेअर बाजार प्राधिकरणाला दिलेल्या माहितीत ही बाब समोर आली आहे. नदाल हा ब्रॅण्ड आणि डिजीटल इनोव्हेशनसाठीचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर असणार आहे.
स्पेनचा 37 वर्षीय राफेल नदाल सलग 209 आठवडे एटीपी क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. नदालने 14 फ्रेंच ओपन विजेतेपदांसह 22 ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. गेल्या दशकापासून रॉजर फेडररसह राफेल नदाल टेनिस विश्वात अधिराज्य गाजवत आहेत.
इन्फोसिससोबतच्या या करारावर राफेल नदालने म्हटले की, “इन्फोसिससोबत जवळून काम करताना मला खूप आनंद होत आहे, ते केवळ विकासासाठीच काम करत नाहीत, तर उज्वल भविष्यासाठी मानवी समुदायातील लोकांना सशक्त करण्यावरही भर देतात. पुढे नदालने म्हटले की, इन्फोसिसने जागतिक टेनिसमध्ये ज्या प्रकारे डिजिटल तंत्रज्ञान आणले आहे, ते मला आवडते. इन्फोसिसने अब्जावधी चाहत्यांसाठी टेनिसचा अनुभव बदलून टाकला आहे आणि सर्व खेळाडूंना त्यांच्या खेळाच्या विश्लेषणासह खरोखर सक्षम केले आहे. अशाप्रकारची काही वर्षांपूर्वी आपण फक्त कल्पनाच करू शकत होतो.
We are delighted to welcome @RafaelNadal to the Infosys family as our global brand ambassador. Hear from him as he talks about exciting times with the partnership. Read more. https://t.co/dqOdOyRHkr #RafaXInfosys #NavigateYourNext #ChampionsEvolve pic.twitter.com/GliBdImFoK
— Infosys (@Infosys) August 24, 2023
इन्फोसिसचे सीईओ आणि मुख्य व्यवस्थापकीय संचालक सलील पारीख यांनी सांगितले की, "जगातील सर्वात प्रतिष्ठित चॅम्पियन अॅथलिट म्हणून राफेल नदालचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून स्वागत करणे अभिमान वाटतो. एटीपी टूर, रोलँड-गॅरोस, ऑस्ट्रेलियन ओपन आणि इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेमचे डिजिटल इनोव्हेशन पार्टनर म्हणून ब्रँड इन्फोसिस एआय, क्लाउड, डेटा अॅनालिटिक्स आणि डिजिटल अनुभवांद्वारे जगभरातील अब्जावधी चाहत्यांपर्यंत टेनिसमधील नवीन तंत्रज्ञान पोहचवले असल्याचे त्यांनी सांगितले.
इन्फोसिस टेक्नॉलॉजीज् लिमिटेड ही एन्.आर. नारायण मूर्ती आणि त्यांच्या सहा सहकाऱ्यांनी पुण्यात 1981 मध्ये स्थापन केलेली माहिती तंत्रज्ञान सेवा कंपनी आहे. तिची भारतात नऊ सॉफ्टवेर विकासकेंद्रे असून जगभरात 30 ठिकाणी कार्यालये आहेत. इन्फोसिसचे 80 हजारांहून अधिक कर्मचारी काम करत आहेत.