(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mutual Funds : SIP मध्ये गुंतवणूक करण्याचे भन्नाट फायदे, पण 'यातील' एक चूकही पडेल महागात
SIP Investment Plan : एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत. पण, ही गुंतवणूक करताना सावधगिरी बाळगणंही गरजेचं आहे.
Mutual Funds : एसआयपी (SIP) गुंतवणूकीचे लोकप्रिय पर्याय आहे. भारतात एसआयपीमध्ये वेगाने गुंतवणूक (Investmen Plan) होत आहे. म्यूचुअल फंड गुंतवणुकीत वाढ होते आहे. खासकरुन एसआयपी (SIP) गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या तेजीत आहे. म्यूचुअल फंड एसआयपी होल्डर्सची संख्या उच्च पातळीवर पोहोचली आहे. एएमएफआयच्या आकडेवारीनुसार, सात वर्ष आधी मासिक एसआयपी गुंतवणूक 3 हजार कोटी रुपये होती, आता हा आकडा वाढून 16 हजार रुपये प्रति महिना पार इतका झाला आहे.
SIP मध्ये गुंतवणुकीचे फायदे
तज्ज्ञांच्या मते, एसआयपीमधून सरासरी 12 टक्के परतावा मिळतो. तुम्ही SIP दीर्घकाळ गुंतवणूक करून भविष्यासाठी मोठी निधी उभारू शकता. गुंतवणुकीसाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत. नवीन वर्षात तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलियोमध्ये म्युच्युअल फंड-एसआयपीला नक्की सामील करा. एसआयपी (SIP) मध्ये गुंतवणूक करण्याला सध्या जास्ता प्राधान्य दिलं जातं, पण यामध्ये गुंतवणूक करण्याआधी याचे फायदे आणि तोटे जाणून घ्या.
एसआयपीमध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत, पण यासोबतच एखादी चूकही तुम्हाला महागात पडू शकते.
लवचिकता
SIP चा पहिला फायदा म्हणजे SIP द्वारे गुंतवणुकीचा कालावधी आणि रकमेबाबत लवचिकता आहे. म्हणजेच तुम्ही तुमच्या सोयीनुसार मासिक, त्रैमासिक किंवा अर्धवार्षिक गुंतवणूक कालावधीचा पर्याय निवडू शकता. याशिवाय, जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा तुम्ही ते गुंतवणूक शकता आणि तुमच्या SIP मधून पैसे काढू शकता आणि तुमचे उत्पन्न वाढले की तुम्ही त्यात गुंतवणूक वाढवूही शकता. एसआयपीमध्ये चक्रवाढीचा मोठा फायदा आहे, यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज मिळते. त्यामुळे एसआयपी गुंतवणूक दीर्घकाळासाठी करणे जास्त फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, SIP मध्ये दरवर्षी 5 किंवा 10 टक्के दराने थोडे गुंतवल्यास त्याचा दीर्घकाळात मोठा फायदा होतो.
रुपयाची सरासरी किंमत
एसआयपीमध्ये तुम्हाला रुपयाच्या सरासरी खर्चाचा फायदा मिळतो. म्हणजेच, जर बाजार घसरत असेल आणि तुम्ही पैसे गुंतवले असतील, तर तुम्हाला जास्त युनिट्स वाटप केले जातील आणि जर मार्केट वाढत असेल, तर वाटप केलेल्या युनिट्सची संख्या कमी असेल. अशा परिस्थितीत, बाजारातील चढउतारांच्या बाबतीतही तुमचा खर्च सरासरी राहतो. म्हणजे बाजार घसरला तरी तुमचे नुकसान होत नाही. अशा परिस्थितीत, जेव्हा बाजार वाढतो तेव्हा तुम्हाला तुमच्या सरासरी गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळण्याची संधी मिळते.
जर तुम्ही एसआयपी सुरू करण्याचा निर्णय घेतला असेल, तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. या चुकांमुळे तुम्हांला नुकसान सहन करावं लागू शकतं.
'या' 5 चुका टाळा, नाहीतर होईल नुकसान
- जेव्हा तुम्ही SIP सुरू कराल तेव्हा आधी योग्य माहिती आणि अभ्यास करा. अभ्यास आणि पडताळणी केल्याशिवाय सुरू केलेली गुंतवणूक नुकसानास कारणीभूत ठरू शकते. जर तुम्हाला याबाबत जास्त माहिती नसेल तर तुम्ही आर्थिक तज्ज्ञांची मदत घेऊ शकता.
- जर तुम्ही एसआयपी सुरू केली असेल तर ती मध्येच थांबवण्याची चूक करू नका. यामुळे तुम्हाला अपेक्षित नफा मिळणार नाही.
- जास्त पैसे कमवण्यासाठी मोठी रक्कम गुंतवू नका. अनेक वेळा लोक विविध कारणांमुळे मोठ्या रकमेची गुंतवणूक चालू ठेवू शकत नाहीत आणि नंतर त्यांना नुकसान सहन करावं लागतं.
- बाजारातील तात्पुरत्या चढउतारांमुळे SIP मध्ये अचानक बदल करू नका. तुमच्या दीर्घकालीन गुंतवणूक धोरणाला चिकटून राहा, त्यातच तुम्हाला जास्त लाभ मिळेल.
- सर्व पैसे एकाच ठिकाणी गुंतवू नका. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणा. यासाठी पोर्टफोलिओमध्ये लार्जकॅप, मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडांचा समावेश करा.
(Disclaimer : ही बातमी केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला एबीपी माझा जबाबदार राहणार नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :