Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडून करण्यात येत आहे. सोबत आता एक सदस्यीय समितीही या प्रकरणाचा तपास करणार आहे.
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी आता न्यायालयीन समिती गठीत करण्यात आली आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश एम.एल. ताहलियानी ही एक सदस्यीय समिती या प्रकरणाची चौकशी करणार आहे. एम एल ताहलियानी यांनी दहशतवादी कसाब खटल्यातील न्यायाधीश म्हणून काम केल्याची माहिती आहे. तर परभणी हिंसाचाराच्या वेळी कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाच्या चौकशीसाठीही निवृत्त न्यायाधीश व्ही एल आचलिया यांची एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. या दोन्ही समित्या सहा महिन्यात त्यांचा अहवाल देणार आहेत.
राज्यभर गाजत असलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. तसेच सीआयडी देखील या प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता त्याची न्यायालयीन चौकशी देखील करण्यात येणार आहे.
समितीला कुणाच्याही चौकशीचा अधिकार
संतोष देशमुख हत्या प्रकरणावर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात निवेदन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या एसआयटी चौकशीसोबतच न्यायालयीन चौकशीची देखील घोषणा केली होती. मात्र या संदर्भात पुढील आदेश निघाले नसल्याने विरोधक सरकारला लक्ष करत होते. आता अखेर या प्रकरणाच्या चौकशीसाठी सेवानिवृत्त न्यायाधिश एम.एल. ताहलियानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या चौकशी समितीचे मुख्यालय बीड येथे राहणार आहे. समितीला चौकशीसाठी कोणत्याही व्यक्तीला बोलावण्याचा तसेच कागदपत्रे जप्त करण्याचा, झडतीचा अधिकार राहणार आहे. सहा महिन्याच्या आत समितीने आपला अहवाल सरकारला सादर करायचा आहे.
सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी
परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झाली होती. त्यानंतर परभणीमध्ये मोठा हिंसाचार उसळला होता. त्याच केसमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय वकील तरुणाला न्यायालयीन कोठडी देण्यात आली होती. पण कोठडीत असतानाच त्याचा मृत्यू झाल्याने या प्रकरणात सरकारवर मोठी टीका झाली. पोलिसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीच्या धक्क्यामुळे सोमनाथचा मृत्यू झाल्याचं पोस्टमार्टेम अहवालात समोर आलं होतं. या प्रकरणाशी संबंधित पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता व्ही एल आचलिया यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. परभणीतील हिंसाचार आणि सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणातील घडलेल्या घटनांचा क्रम, त्याची कारणे आणि परिणाम याचा अभ्यास या समितीकडून करण्यात येणार आहे.
ही बातमी वाचा: