"हॅलो.. अभिनंदन दिवळीनिमित्त तुम्हाला..." सणासुदीच्या काळात होऊ शकतो ऑनलाईन शॉपिंग स्कॅम, नेमकी काय खबरदारी घ्यावी?
सणासुदीच्या काळात तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्स देणारे अनोळखी फोन कॉल्स येऊ शकतात. त्यामुळे तुमची ऑनलाईन फसवणूक होऊ शकते. तसे होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.
मुंबई : दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी आतापासूनच अनेक कुटुंबांत तयारी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे कोणते कपडे घ्यायचे? काय-काय खरेदी करायची? याचंही अनेकजण प्लॅनिंग करत असतील. मात्र याच सणासुदीच्या काळात लोकांतील उत्साह आणि बाजारात होणारी उलाढाल लक्षात घेता अनेकजण ग्राहकांची फसवणूकही करतात. ऑलनाईन शॉपिंगच्या माध्यमातून तर वेगवेगळे स्कॅम होण्याची शक्यता अधिक असते. याच पार्श्वभूमीवर तुमच्यासोबत ऑनलाईन स्कॅम होऊ नये, म्हणून काय खबरदारी घ्यावी? हे जाणून घेऊ या...
सरकारने जारी केले मार्गदर्शक तत्त्वे
लोकांचा खरेदीसाठीचा उत्साह लक्षात घेऊन अनेक स्कॅमर्स अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत अनेकांसोबत ऑनलाईन स्कॅम होऊ शकतो. हीच बाब लक्षात घेता भारतीय कॉम्प्यूटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने (सीईआरटी-इन) लोकांना योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच एक मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहे.
अनोळखी कॉल रिसिव्ह करताना काळजी घ्या
सरकारने ऑनलाईन शॉपिंग करताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत सांगितलं आहे. भारतीय कॉम्प्यूटर इमर्जन्सी टीम अशा प्रकारच्या स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत. तुमच्या फोनवर एखादा अनोळखी कॉल आला तर तो रिसिव्ह करताना फोन कॉलची ओळख पटवण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा व्हिडीओ कॉल रिसिव्ह करणे टाळा. फोन कॉलवर अनोळखी व्यक्तीने पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले तर ते करू नका. कोणतीही शासकीय संस्था कोणतेही शासकीय काम करण्यासाठी व्हॉट्सअॅप किंवा स्काईप यासारख्या माध्यमांचा वापर करत नाही.
कोणासोबतही ओटीपी शेअर करू नका
अनेकदा फसवणूक झाल्यास संबंधित व्यक्ती घाबरून जाते. मात्र घाबरून न जाता घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नये. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला फोन कॉलवर तुमची वैयक्तिक तसेच आर्थिक माहिती सांगू नये. कॉलवर कोणालाही ओटीपी सांगू नये. एखादा फोन कॉल, व्हिडीओ कॉल, मेसेज, मेल संदिग्ध वाटला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. त्याला रिपोर्ट करा किंवा पोलिसांच्या निदर्शनास आणून द्या.
संशयास्पद मेल आल्यावर काय करावे?
मेलवर एखाद्या अनोळखी मेलवरून तुम्हाला एखादी अटॅचमेंट, फाईल आली असेल तर ती डाऊनलोड करू नका. अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणतेही अॅप डाऊनलोड करू नका. फोनमध्ये अॅप डाऊनलोड करायचे असेल तर गुगल स्टोअर, आयओएस स्टोअर, अॅपच्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा.
हेही वाचा :
ह्युंदाईचा आयपीओ धडाम् झाल्याने स्विगीने IPO साठी घेतला मोठा निर्णय; नवी माहिती आली समोर!