Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुखांचे कुटुंबीय आज मुंबईत CM फडणवीसांच्या भेटीला, काय चर्चा होणार? राज्याचं लक्ष
Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
मुंबई : बीड येथील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांचे हत्या प्रकरण राज्यभरात चांगलेच चर्चेत आले आहे. तीन फरार आरोपींपैकी दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. तर सिद्धार्थ सोनावणे याआधी अटकेत असून तिघांना 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही फरार आहे. पोलीस कृष्णा आंधळेचा कसून शोध घेत आहेत. त्यातच आता संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेणार आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवन आणि विधान भवनाच्या बाहेर देखील या संदर्भात कसा तपास सुरू आहे याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. तपासामध्ये कुठल्या गोष्टी समोर येत आहेत हे सांगत असतानाच या प्रकरणात कोणालाही सोडणार नाही, असा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे.
संतोष देशमुखांचे कुटुंबीय मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
संतोष देशमुख प्रकरणातील एक आरोपी अजूनही फरार असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. या परिस्थितीत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेणार आहेत. या प्रकरणात आतापर्यंत कशा पद्धतीने तपास झालेला आहे याची माहिती फडणवीस संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना देतील, अशी माहिती मिळत आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर मस्साजोगमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी हजेरी लावली. मात्र, आता संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख, संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी आणि त्यांच्या पत्नी हे संध्याकाळी मुंबईमध्ये पोहोचणार आहेत. ते आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतील. या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
हत्येचं राजकारण होऊ नये : देवेंद्र फडणवीस
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड (Walmik Karad) याच्यावर आरोप करण्यात आले आहेत. सध्या वाल्मिक कराडला चौकशीसाठी सीआयडी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वाल्मिक कराड हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या जवळचे असल्याने विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची वारंवार मागणी केली जात आहे. "आरोपी कुठेही गेले असतील, कोणीही मदत केली असली तरी त्यांच्यावर कारवाई सुरु आहे हे दिसतंय. मदत करणाऱ्यांनाही आम्ही सोडत नाहीय. या प्रकरणाचा वापर राजकारणासाठी करु नये, सरपंचाची हत्या झाली आहे. त्या हत्येचं राजकारण होऊ नये, तर समाजात काहीतरी सुधार व्हावा, असा आमचा प्रयत्न आहे", असे त्यांनी म्हटले होते.
आणखी वाचा