एका वर्षात सोनं खरेदी करणारे मालामाल! अनेकांच्या तिजोऱ्या पैशांनी भरल्या; यंदाच्या धनत्रयोदशीला सोनं खरेदी करावं का?
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळालेली आहे. त्यामुळे भविष्यात सोन्यात गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार का? असे विचारले जात आहे.
Gold Investment : सोने आणि चांदी हे दोन मौल्यवान धातू आहेत. या दोन्ही धातूंचा वापर दागिने तयार करण्यासाठी केला जातो. दरवर्षी सणासुदीच्या काळात सोने आणि चांदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. आता दिवाळी या वर्षाच्या सर्वांत मोठ्या सणाला मोजकेच दिवस शिल्लक राहिले आहेत. दिवाळीआधी धनत्रयोदशी हा सण असतो. धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून अनेकजण सोनं खरेदीकरतात. पण सोन्यात गुंतवणूक केल्यास खरंच फायदा होतो का? सोन्यात गुंतणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळतो का? हे जाणून घेऊ या..
धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणे हे फारच शुभ मानले जातो. त्यामुळे यावर्षीदेखील धनत्रयोदशीला सराफा बाजारात मोठी उलाढाल होणार आहे. सोन्यात केलेल्या गुंतवणुकीचा परतावा जाणून घेण्यासाठी गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किमतीत किती वाढ झाली आहे? हे समजून घेणं गरजेचं आहे. वर्षभरात सोन्याचा भाव दिवसेंदिवस वाढत गेलेला आहे. या एका वर्षात सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना तब्बल 30 टक्क्यांनी रिटर्न्स मिळाले आहेत. म्हणजेच 2024 साली इक्विटी मार्केटच्या बरोबरीने यावेळी सोन्याने गुंतवणूकदारांना रिटर्न्स दिले आहेत.
गेल्या धनत्रयोदशीला सोन्याचा भाव किती होता?
गेल्या वर्षभरात सोन्याच्या दरात मोठी वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर रोजी धनत्रयोदशी होती. त्या दिवशी सोन्याचा भाव 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. या वर्षी सोनं 80 हजारांच्याही पुढे गेलं आहे. शेअर बाजाराशी तुलना करायची झाल्यास सेन्सेक्स गेल्या सहा महिन्यांत फक्त आठ टक्क्यांनी वाढला आहे. सोन्याच्या भावात मात्र सतत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. वैश्विक तणाव, महागाई अशी अनेक संकटं असूनही वर्षभरात सोन्याचा भाव चांगलाच वाढलेला आहे. इतर गुंतवणुकीच्या तुलनेत सोन्यात केलेली गुंतवणूक ही सुरक्षित मानली जाते.
लग्नसराईमुळेही भविष्यात सोन्याचा भाव वाढणार?
यावेळी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्याच्या भावात वाढ होऊ शकते. त्यानंतर दिवाळी आहे. दिवाळीनंतर लग्नसराई सुरू होईल. त्यामुळे सोन्याच्या भावात मोठी वाढ होऊ शकते. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या मतानुसार सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच योग्य वेळ आहे. कारण आता गुंतवणूक केल्यास भविष्यात तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळू शकतात. गुंततवणूकदार गोल्ड ईटीएफ (Gold ETF) मध्येही गुंतवणूक करू शकतात.
हेही वाचा :
बँकेत नोकरी मिळवण्याची मोठी संधी, अर्ज करण्यासाठी उरले काहीच दिवस, नेमकी काय आहे पात्रता?