Santosh Deshmukh Case: कोयता, 41 इंचाचा रॉड, फायटर अन्... संतोष देशमुखांच्या हत्येचा अंगावर काटा आणणारा घटनाक्रम
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुखांना मारताना आरोपींच्या चेहऱ्यावर भीती किंवा पश्चातापाचा लवलेशही नव्हता; पोलिसांची कोर्टात माहिती. करदोड्याची मूठ तयार करुन रॉडने मारलं
बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करण्यात आली. ही मारहाण करताना त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग करण्यात आले होते. आरोपींनी संतोष देशमुख यांना कत्तीने मारलं, फायटरने मारलं, 41 इंचाचा एक रॉड होता, त्याला करदोड्याने मूठ तयार करण्यात आली होती. या लोखंडी रॉडने संतोष देशमुख यांच्या अंगावर अनेक फटके मारण्यात आले, असे वक्तव्य भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केले. सुरेश धस यांनी सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात भाष्य केले.
प्रचंड मारहाण करण्यात आल्यानंतर संतोष देशमुख तहानेने व्याकूळ झाले होते. तेव्हा आरोपींनी त्यांना पाणी मागितल्यानंतर त्यांच्या तोंडात लघवी केली. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना जामीन मिळालाच नाही पाहिजे. त्यांना फाशी झाली पाहिजे. आता त्यांची राखच बाहेर आली पाहिजे. वाल्मिक कराड आणि त्यांचे साथीदार आता सुटले तर भविष्यात त्यांची लॉरेन्स बिश्नोईसारखी दहशत निर्माण होईल, असे वक्तव्य सुरेश धस यांनी केले.
सीआयडी आणि एसआयटीकडून सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास सुरु आहे. संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागले आहे. यामधून संतोष देशमुख यांची किती क्रुरपणे हत्या करण्यात आली, याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांना बेदम मारहाण केल्यानंतरी त्यांचा जीव जात नव्हता. तेव्हा आरोपींनी त्यांच्या छातीवर उड्या मारल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणातील आरोपी जयराम चाटे, प्रतिक घुले, महेश केदार, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे सध्या पोलीस कोठडीत आहेत. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.
संतोष देशमुखांना मारताना आरोपींच्या चेहऱ्यावर भीती किंवा पश्चातापाचा लवलेशही नव्हता
मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. सीआयडी आणि एसआयटीने केलेल्या तपासात आरोपींबाबत माहिती गोळा केली जात आहे. आज या प्रकरणात चार आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले. त्यावेळी पोलिसांनी आरोपींबाबत महत्त्वाची माहिती न्यायालयाला सांगितली. संतोष देशमुख यांची हत्या करताना मारेकऱ्यांच्या डोळ्यात कोणतीही भीती अथवा पश्चाताप नव्हता. तर सीआयडी तपासात डिजिटल एव्हिडन्स हाती लागलेत. या माध्यमातून देखील सध्या तपास केला जातोय. तर देशमुख यांच्या मारेकऱ्यांना पळून जाण्यास यांनी मदत केली त्यांचा शोध घेतला जात आहे. यातील अनेकांचे मोबाईल बंद आढळून आलेत तर वास्तव्यास असलेल्या पत्त्यावर ते मिळून आलेले नाहीत.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तांत्रिक बाबींमुळे उघड होत आहे. आरोपींनी वापरलेले मोबाईल्स त्याचे लोकेशन आणि सीडीआर या माध्यमातून तपास यंत्रणेला अनेक धागेदोरे मिळत आहेत. गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी आणि त्यात आढळून आलेले पाच मोबाईल त्याहून तपास यंत्रणा सध्या या प्रकरणाची उकल करत आहेत. सदर कुणाच्या तपासा दरम्यान डिजिटल एव्हिडन्स प्राप्त झाले असून त्यामध्ये गुन्हा करत असताना आरोपींच्या डोळ्यात कोणतेही भीती किंवा पश्चाताप दिसून आलेला नाही.
चार लोखंडी रॉड, फायटर, कत्ती आणि लाकडी काठीने केली मारहाण
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीला केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यानंतर आणखी दोन आरोपींचा यात समावेश करण्यात आला आहे. या घटनेत सरपंच देशमुख याला झालेल्या मारण्यात तब्बल 56 जखमा अंगावर आढळून आल्या. ज्यात एक गॅसचा पाईप त्याची लांबी 41 इंच होती. त्यावर मूठ तयार करून हत्यार बनविण्यात आले. तसेच लाकडी दांडा तलवारी सारखे धारदार शस्त्र, चार लोखंडी रॉड, लोखंडी फायटर धारदार कत्ती वापरण्यात आली. त्यातील एक गॅस, पाच क्लस वायर, लोखंडी रॉड, लाकडी काठी, पांढऱ्या प्लास्टिक पाईपचे तुकडे स्कॉर्पिओ, स्विफ्ट गाडी आणि पाच मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत.
आणखी वाचा
संतोष देशमुखांच्या भावाचे विष्णू चाटेला 35 कॉल, 36 व्या कॉलला डेड बॉडीच पाठवली