Sanjay Raut : अजित पवार अॅक्सिडेंटल नेते, त्यांच्यात हिंमत असती तर...; बीड प्रकरणावरून संजय राऊतांचा बोचरा वार, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
Santosh Deshmukh Case : मंत्री धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. यावरून संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
Sanjay Raut on Ajit Pawar : बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. या प्रकरणाचा मास्टरमाइंड मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड (Walmik Karad) असल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे. त्यातच धनंजय मुंडे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. जोपर्यंत धनंजय मुंडेंविरोधात पुरावा मिळत नाही तोपर्यंत त्यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, अशी माहिती समोर आली आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.
संजय राऊत म्हणाले की, त्यांच्या सरकारने आम्हाला पुराव्याशिवाय तुरुंगात टाकले होते. तेव्हा अजित पवार काहीही बोलले नाही. आता कसल्या पुरावाच्या गोष्टी करत आहात? बीडमध्ये लोकांना फसवण्याचा खेळ सुरू आहे. आरोपी पोलीस आणि राजकारण्यांचे एकत्रित जेवणाचे फोटो, बैठकांचे फोटो समोर येत आहेत. भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने आपल्या माफिया मित्रपक्षांना सांभाळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे माफियाकरण होईल. बीड पॅटर्न जर महाराष्ट्रात लागू झाला तर प्रत्येक जिल्ह्यात बीड पॅटर्न लागू होईल. माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, बीडमधील संपूर्ण पोलीस खाते बरखास्त करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडच्या बाहेर चालवला पाहिजे. एसआयटीमधील प्रत्येक पोलीस अधिकाऱ्याची तपासणी केली पाहिजे, असे मागणी त्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
अजित पवार अॅक्सिडेंटल नेते
खंडणीचे प्रकरण संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडले जात आहे. त्या खंडणीची ३ कोटी रुपयांची डील धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर झाल्याचा सनसनाटी आरोप सुरेश धस यांनी केला. या बैठकीत वाल्मिक कराडसह नितीन बिक्कड असल्याचे त्यांनी म्हटले होते. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, हे सगळे पुरावे समोर आलेले आहेत. पुरावे समोर आल्यावर अजित पवारांना कोणते पुरावे पाहिजे आहेत? अजित पवारांनी भारतीय संविधानातला इंडियन ॲक्ट एव्हिडन्स बदलला आहे का? अजित पवार हे हतबल झाले आहेत. अजित पवार हे नेते नाहीत. अजित पवार अॅक्सिडेंटल नेते आहेत. भारतीय जनता पक्षाच्या ईव्हीएमच्या कृपेने त्यांना जागा मिळालेल्या आहेत. स्वतःच्या कर्तुत्वावर नाही. त्यांच्यात हिमंत असती तर त्यांनी आपल्या मंत्र्याचा राजीनामा घेतला असता, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली.
सुरेश धस बोलतात आणि मग माघार घेतात
संजय राऊत पुढे म्हणाले की, बीडच्या प्रकरणाचा तपास ही धूळफेक आहे. अजूनही वाचवण्याचे प्रकार सुरू आहेत. खरे आरोपी आजही बाहेर आहेत. सुरेश धस बोलतात आणि नंतर माघार घेतात. सुरेश धस हे हिंमतीने उभे राहिले असतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी आणि महाराष्ट्राला जो बीड पॅटर्नचा कलंक लागल्या तो पुसण्यासाठी एक आमदार म्हणून नव्हे तर महाराष्ट्राचा मराठी नागरिक म्हणून त्यांनी आपली लढाई चालू ठेवली पाहिजे. आम्ही सगळे त्यांच्या सोबत उभे राहू, असेही त्यांनी म्हटले.