Mhada Lottery : म्हाडाच्या कोकण मंडळाचा धमाका, तब्बल 12 हजार घरांसाठी दोन योजना जाहीर,जाणून घ्या सर्व माहिती
Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या कोकण मंडळानं घरांच्या विक्रीसाठी दोन योजना जाहीर केल्या आहेत. याद्वारे 12 हजार घरांची विक्री केली जाणार आहे.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2030 घरांची सोडत नुकतीच पार पडली आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळानं 2030 घरांच्या विजेत्यांची नावं 8 ऑक्टोबरला जाहीर केली होती. आता म्हाडाच्या कोकण मंडळानं घरांच्या विक्रीसाठी दोन योजना जाहीर केल्या आहेत. या योजनेनुसार 12226 घरांची विक्री करण्यात येणार आहे. यापैकी प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य विक्री योजना आणि सदनिका विक्री सोडत जाहीर अशा दोन योजनांद्वारे घरांची विक्री केली जाईल. यापैकी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य विक्री याद्वारे 11187 घरांची विक्री करण्यात येणार आहे. तर, सदनिका विक्री सोडत योजना द्वारे 1439 घरांची विक्री करण्यात येणार आहे.
कोणत्या योजनेत किती घरं?
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य विक्री योजना याद्वारे 11187 घरांची विक्री करण्यात येणार आहे. यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना, एकात्मिक गृहनिर्माण योजना, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, कोकण मंडळ प्रकल्पातील विखुरलेल्या सदनिका यातील घरांची विक्री केली जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना 9883 घरांची विक्री केली जाणार आहे. एकात्मिक गृहनिर्माण योजना 512 घरं, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना 661 आणि कोकण मंडळ प्रकल्पातील विखुरलेल्या सदनिकांची संख्या 131 विक्री करण्यात येणार आहे.
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य विक्री योजनेतील घरांच्या विक्रीसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात दुपारी 11 ऑक्टोबरपासून होणार आहे. यानंतर ऑनलाईन अर्ज दाखल केल्यानंतर शुल्क भरण्यासाठी 12 ऑक्टोबरपासून शुल्क भरता येईल. अनामत रक्कम भरुन पात्र ठरलेल्या अर्जदारांची नावं प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला सायंकाळी 6 वाजता जाहीर केली जाणार आहेत. ही योजना घरं उपलब्ध असेल तोपर्यंत सुरु राहील.
सदनिका विक्री सोडत योजनेद्वारे 1439 घरांची विक्री केली जाणार आहे. या योजनेत सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, कोकण मंडळ अंतर्गत सदनिका, कोकण मंडळ अंतर्गत भूखंड, पत्रकारांसाठी आरक्षित सदनिकांचा समावेश आहे. सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेतील 594 घरं, कोकण मंडळ अंतर्गत सदनिका 607, कोकण मंडळ अंतर्गत भूखंड 117, पत्रकारांसाठी आरक्षित सदनिका 121 घरांची विक्री केली जाणार आहे. या घरांसाठी अर्ज दाखल करण्यास सुरुवात 11ऑक्टोबरपासून होणार आहे. तर, ही प्रक्रिया 10 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. यानंतर या लॉटरीची सोडत 27 डिसेंबर रोजी काढली जाणार आहे.
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज कुठं करायचा?
अर्जदारांना म्हाडाच्या प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेसाठी https://lottery.mhada.gov.in आणि कोकण म्हाडा सोडतीसाठी अर्ज करणाऱ्यांना https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर अर्ज दाखल करता येणार आहेत.
इतर बातम्या :