Tamilnad Mercantile Bank IPO: देशातील सर्वात जुन्या बँकेचा IPO आजपासून खुला; जाणून घ्या माहिती
Tamilnad Mercantile Bank IPO: देशातील सर्वात जूनी बँक असलेल्या Tamilnad Mercantile Bank चा आयपीओ आजपासून खुला झाला आहे. जाणून घ्या अधिक माहिती.
Tamilnad Mercantile Bank IPO: देशातील सर्वात जुनी बँक असलेल्या तमिलनाड मर्केंटाइल बँकेचा (Tamilnad Mercantile Bank) आयपीओ (IPO) आजपासून खुला झाला आहे. या आयपीओत 7 सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करण्याची संधी असणार आहे. कंपनीने आयपीओसाठी 500-525 रुपये प्रति शेअर किंमत निश्चित केली आहे. तर, 14 सप्टेंबर रोजी यशस्वी अर्जदारांना शेअर्सचे वाटप होणार आहे. तर, कंपनी शेअर बाजारात 15 सप्टेंबर रोजी सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे.
तमिलनाड मर्केंटाइल बँक (Tamilnad Mercantile Bank) ही देशातील सर्वात जुनी खासगी बँक आहे. ही बँक मुख्यत: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSME), कृषी आणि घाऊक ग्राहकांना बँकिंग आणि वित्तीय सेवा बँकेकडून पुरवली जाते. ही बँक 100 वर्ष जुनी बँक आहे. वर्ष 1921 मध्ये Nadar Bank बँक म्हणून बँकेची सुरुवात झाली होती. सध्या या बँकेच्या 509 शाखा आहेत. त्यातील 369 शाखा तामिळनाडूमध्ये आहे. बँकेच्या व्यवसायात तामिळनाडूतील शाखांचे 70 टक्क्याहून अधिक योगदान आहे. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये बँकेचे उत्पन्न 8212 कोटी रुपये होते.
आयपीओत किती शेअर्सचा लॉट?
तामिळनाड मर्कंटाइल बँक आयपीओमध्ये लॉट साइज 28 शेअर्सवर निश्चित करण्यात आला आहे. किमान एक लॉट खरेदी करणे आवश्यक आहे; या अर्थाने या आयपीओमध्ये किमान 14700 रुपयांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
आयपीओतील निधी कशासाठी वापरणार?
तमिलनाड मर्केंटाइल बँक (Tamilnad Mercantile Bank) आयपीओतून मिळणाऱ्या निधीचा वापर आपल्या भांडवलात वाढ करण्यासाठी आणि आगामी काळातील योजनांसाठी लागणाऱ्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी या निधीचा वापर होणार आहे. बँकेकडून इतर राज्यातही टप्प्याटप्प्याने व्यवसाय वाढवण्यात येणार आहे.
तज्ज्ञांचा सल्ला काय?
बहुतांशी ब्रोकरेज संस्था आणि रिसर्च एजन्सी यांनी या आयपीओमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. बँकेने चांगली कामगिरी केली असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. त्याशिवाय, बँकेचा नेट एनपीए 1 टक्क्यांहून कमी आहे. त्याशिवाय, बँकेच्या उत्पन्नात सातत्याने वाढ होत आहे. तज्ज्ञांनी दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
(Disclaimer : ही बातमी फक्त माहितीसाठी आहे. कोणतीही गुंतवणूक करण्याआधी तुमच्या आर्थिक सल्लागारासोबत गुंतवणूक करून निर्णय घ्यावा. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण असते. योग्य विचारांती गुंतवणूक करावी. तुमच्या आर्थिक फायदा-नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.)