Indian Rupee : रुपयाची ऐतिहासिक घसरण, रुपयाचा दर 78.87 रुपये प्रति डॉलरवर
Indian Rupee : रुपयात सुरू असलेली घसरण आजही कायम असून आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने नवा नीचांकी दर गाठला.
Indian Rupee : रुपयात सुरू असलेली घसरण आजही कायम आहे. बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांच्या माघारीमुळे बुधवारी सुरुवातीच्या व्यापारात रुपयाचे मूल्य अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 11 पैशांनी घसरून 78.96 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचले.
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 78.86 च्या कमकुवत दरावर उघडला. त्यानंतर त्यात 11 पैशांची आणखी घसरण झाली आणि 78.96 रुपये प्रति डॉलर हा नीचांकी दर गाठला.
मंगळवारी डॉलरच्या तुलनेत रुपया 48 पैशांनी घसरून 78.85 या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. चलन बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, प्रति डॉलर रुपयाचा दर 80 रुपये होण्याची शक्यता आहे. या वर्षात रुपयांत आतापर्यंत सहा टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून आले आहे. जून महिन्यातच रुपयाच्या दरात 1.5 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे.
परदेशी गुंतवणूकदारांकडून सातत्याने गुंतवणूक काढली जात आहे. त्यामुळे रुपया बुधवारी सकाळच्या सत्रात 11 पैशांनी घसरला. आंतरबँक परदेशी चलन विनिमय बाजारातील रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आणखी कमकुवत झाला. त्यानंतर यात आणखी घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत हा रुपयांचा आतापर्यंतचा नीचांकी दर आहे.
दरम्यान, शेअर बाजारातील प्राथमिक आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मंगळवारी 1,244.44 कोटींच्या शेअरची विक्री केली. जागतिक तेल बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्युचर्स 0.88 टक्क्यांनी घसरून USD 116.94 प्रति बॅरल झाले. दरम्यान, सहा चलनांच्या बास्केटच्या तुलनेत डॉलरची स्थिती दर्शवणारा निर्देशांक 0.08 टक्क्यांनी घसरून 104.42 वर व्यवहार करत होता.
भारत कच्च्या तेलाची सर्वाधिक आयात करतो. भारतातील इंधनाची गरज भागवण्यासाठी 80 टक्के कच्चे तेल आयात केले जाते. सरकारी इंधन कंपन्यांकडून डॉलरमध्ये कच्च्या तेलाची खरेदी केली जाते. रुपयाच्या तुलनेत डॉलर महाग झाल्यास भारतीय इंधन कंपन्यांना कच्चे तेल खरेदी करण्यासाठी अधिक डॉलर मोजावे लागतील. त्यामुळे महागाई वाढण्याची भीती आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: