एकनाथ शिंदेंनी टाकला विश्वास; पुण्याच्या रवींद्र धंगेकरांना शिवसेनेत मोठी जबाबदारी, पत्र जारी
राजकारणात सतत चर्चेत राहणारे रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता.

पुणे : काँग्रेसला बाय बाय करत शिवधनुष्य हाती घेतलेल्या माजी आमदार रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) शिवसेनेते मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवेसना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने रवींद्र धंगेकरांना पुणे (Pune) शहरात पक्षवाढीची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार, रवींद्र धंगेकर यांची शिवसेना पुणे शहराध्यक्षपदी (कार्यक्षेत्र -पुणे महानगर) निवड करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ही निवड करण्यात आल्याचं पत्रात म्हटलं आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या सहीने हे पत्र देण्यात आलं आहे. आता, धंगेकरांची निवड केल्यामुळे पुण्यात शिवसेना (Shivsena) शिंदे गटाची ताकद वाढणार का हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल. मात्र, या निवडीने शिंदे गटाला बळ मिळालं आहे.
राजकारणात सतत चर्चेत राहणारे रवींद्र धंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशानंतरच राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती की धंगेकर यांच्यावर लवकरच मोठी जबाबदारी सोपवली जाणार. मात्र, आपण कुठल्याही पदासाठी पक्षात प्रवेश केला नसून एकनाथ शिंदेंच्या विकासकामांचा अजेंडा पाहून आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचं धंगेकरांनी म्हटलं होतं. त्यातच, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना शिवसेनेत कुठली जबाबदारी दिली जाईल, याकडेही सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला असून शिवसेना पुणे शहराध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे.
दरम्यान, रवींद्र धंगेकर ह्यांनी विधानसभा पोटनिवडणुकीत विजय मिळवल्याने ते राज्यभर चर्चेत आले होते. काँग्रेसच्या तिकीटावर ते पहिल्यांदा आमदार बनून विधानसभेत पोहोचले, त्यानंतर सत्ताधाऱ्यांवर सातत्याने आक्रमक टीका केल्याने ते चर्चेत होते. पुण्यातील ड्रग्ज प्रकरण असो किंवा पुण्यातील गुन्हेगारीच्या मुद्द्यावरुन त्यांनी महायुती सरकारला सातत्याने लक्ष्य केलं होतं. मात्र, नुकतेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला. त्यानंतर, पुढील राजकीय मार्गावर वळण घेत त्यांनी काँग्रेसला बाय करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
























