Bloomberg Survey : अमेरिका, चीनसह आशिया युरोपमध्ये मंदीचं सावट, भारतासाठी मात्र दिलासा
Bloomberg Survey : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेमध्ये निर्माण झालेली भयावह परिस्थिती जगासमोर आहे. युरोप, अमेरिकासह जगभरात आर्थिक मंदीची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे.
Bloomberg Survey : आर्थिक संकटामुळे श्रीलंकेमध्ये निर्माण झालेली भयावह परिस्थिती जगासमोर आहे. युरोप, अमेरिकासह जगभरात आर्थिक मंदीची शक्यता अनेक अर्थतज्ज्ञांनी वर्तवला आहे. अशातच ब्लूमबर्गने जगातील अनेक देशामध्ये आर्थिक मंदीची शक्यता वर्तवली आहे. अमेरिका, चीन, युरोपसह आशिया खंडामध्येही मंदी येण्याचा अंदाज ब्लूमबर्गच्या सर्व्हेतून व्यक्त करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, भारतासाठी परिस्थिती दिलासादायक आहे. कारण, ब्लूमबर्गनुसार भारतात आर्थिक मंदीची शक्यता शून्य आहे. श्रीलंका सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे आणि पुढील वर्षी मंदीचा धोका 85 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मागील सर्वेक्षणात श्रीलंकेवर मंदीचा धोका 33 टक्के होता. याशिवाय, न्यूझीलंडवर 33 टक्के, तैवानवर 20 टक्के, ऑस्ट्रेलियावर 20 टक्के आणि फिलिपाइन्सवर 8 टक्के मंदीची शक्यता आहे.
ब्लूमबर्गच्या सर्व्हेनुसार, अनेक अर्थत्ज्ञांचं असे मत आहे की, महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरातील प्रमुख बँका व्याजदर वाढवत आहेत. अमेरिका, ब्रिटेन आणि अन्य देशांसह न्यूझीलंड, तैवान, ऑस्ट्रेलिया आणि फिलिपिन्सच्या केंद्रीय बँका वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी व्याजदरात वाढ करत आहेत. त्यामुळे मंदीची शक्यता आणखी वाढत आहे. सध्या युरोप आणि अमेरिका येथे सर्वात मोठं आर्थिक संकट आहे. युरोपमध्ये 55 टक्के आर्थिक मंदीची शक्यता आहे. तर अमेरिकामध्ये मंदीची शक्यता 40 टक्के इतकी आहे.
आशियाई अर्थव्यवस्थांवर मंदीचा धोका असला तरी त्यांची स्थिती अमेरिका आणि युरोपीय देशांपेक्षा चांगली असल्याचं अर्थशास्त्रांचं मत आहे. भारतामध्ये मंदीची शून्य शक्यता दिली आहे. ते म्हणतात की, भारत इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत खूपच चांगल्या स्थितीत असल्याचे दिसत आहे. आशियामध्ये आर्थिक मंदीचा धोका 20 ते 25 टक्के असताना अमेरिकेत हा धोका 40 टक्के इतका आहे तर युरोपमध्ये 50 टक्केंपेक्षा जास्त धोका आहे. इटलीमध्ये मंदीची 65 टक्के, फ्रान्समध्ये 50 टक्के आणि जर्मनीमध्ये 45 टक्के शक्यता आहे. ब्रिटनमध्येही मंदीची 45 टक्के शक्यता आहे.
ब्लूमबर्गच्या सर्व्हेनुसार कोणत्या देशात किती टक्के आर्थिक मंदीची शक्यता?
श्रीलंका 85 टक्के
न्यूझीलंड 33 टक्के
दक्षिण कोरिया 25 टक्के
जपान 25 टक्के
ऑस्ट्रेलिया 20 टक्के
तैवान 20 टक्के
पाकिस्तान 20टक्के
थायलंड 10 टक्के
फिलिपायन्स 8 टक्के
इंडोनेशिया 3 टक्के
भारत 0 टक्के