क्रेडिट कार्ड वापरताना 'या' तीन चुका कधीच करू नका, अन्यथा खिसा होईल खाली!
आजकाल क्रेडिट कार्ड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र क्रेडिट कार्डचा वापर करताना काही बाबींची काळजी घेतली पाहिजे, ही काळजी न घेतल्यास तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
मुंबई : आजकाल क्रेडिट कार्डचा वापर (How to use Credit Card) चांगलाच वाढला आहे. शहर तसेच खेडेगावातही आजकाल अनेकजण क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्डवर जेवढे जास्त ट्रान्झिशन्स कराल तेवढे जास्त रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक मिळते. म्हणूनच अनेकजण क्रेडिट कार्डचा जास्तीत जास्त वापर कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करतात. मात्र क्रेडिट कार्डचा वापर करणे म्हणजे एका प्रकारे कर्ज घेण्यासारखे आहे, हे अनेकांना माहिती नाही. त्यामुळे क्रेडिट कार्डचा वापर करताना काय काळजी घ्यावी? कोणत्या चुका करू नयेत? हे जाणून घेऊ या....
क्रेडिट कार्डच्या मदतीने कॅश कधीच काढू नका
क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही एटीएममधून पैसे काढू शकता. बँक तुम्हाला ही फार चांगली सुविधा आहे, असे सांगते. मात्र तुम्ही एटीएममधून क्रेडिट कार्डच्या मदतीने पैसे काढल्यास पहिल्या दिवसापासूनच 2.5 ते 3.5 टक्क्यांनी व्याज लागते. म्हणजेच तुम्ही काढलेल्या पैशांवर वर्षाला 30 ते 42 टक्के व्याज लागू शकते. क्रेडिट कार्डच्या माध्यमातून केलेल्या शॉपिंगचे बिल भरण्यासाठी तुम्हाला महिन्याभराचा वेळ दिला जातो. मात्र यावेळेनंतर ड्यू डेट संपल्यावर तुम्हाला व्याज भरावे लागते. दुसरीकडे मात्र क्रेडिट कार्डच्या मदतीने तुम्ही काढलेल्या पैशांवर पहिल्या दिवसापासूनच व्याज भरावे लागते.
आंतरराष्ट्रीय व्यवहार महागात पडेल
क्रेडिट कार्डचा वापर परदेशातही करता येतो. अनेकांना क्रेडिट कार्डचे हे फीचर फार चांगले वाटते. मात्र विदेशात क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बिल पे केल्यास तुम्हाला ट्रान्झिशन चार्ज द्यावा लागतो. हा ट्रान्झिशन चार्ज कमी जास्त होत राहतो. त्यामुळे विदेशात क्रेडिट कार्डच्या ऐवजी प्रीपेड कार्डचा वापर करायला हवा.
बॅलेन्स ट्रान्सफरसाठी क्रेडिट कार्डचा जास्त वापर करू नका
अनेक क्रेडिट कार्ड्सवर बॅलेन्स ट्रान्सफरचा ऑप्शन दिला जातो. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमच्याजवळच्या एका क्रेडिट कार्डचे बिल दुसऱ्या क्रेडिट कार्डच्या मदतीने देऊ शकता. मात्र बॅलेन्स ट्रान्सफरची ही सोय मोफत नसते. बँक या फिचरवर फी आकारते. यामुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. आपत्कालीन स्थितीत बॅलेन्स ट्रान्सफरचा पर्याय वापरायला हरकत नाही. मात्र प्रत्येक वेळी या फिचरचा वापर केल्यास तुम्हाला फी च्या रुपात अनेक पैसे भरावे लागू शकतात.
हेही वाचा :
बँकेकडून कर्ज घेताना 'या' पाच गोष्टींची काळजी घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे आर्थिक नुकसान!