Gold Rate : डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ बॉम्ब अन् चीनच्या पलटवारामुळं सोनं घसरलं, सोन्याचे दर कितीपर्यंत खाली येणार?जाणून घ्या अंदाज
Gold Price Today: अमेरिकेचं अध्यक्षपद डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारल्यानंतर त्यांनी विविध देशांवर टॅरिफ लादण्याची घोषणा केली होती. त्यानंतर सोन्यामधील गुंतवणूक वाढली होती.

Gold Price Today: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून लादण्यात आलेलं टॅरिफ त्याला चीननं दिलेलं प्रत्यु्त्तर यामुळं भारतीय कमोडिटी बाजारात मोठा उलटफेर झाला. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर जून 2025 च्या वायद्याचे सोन्याचे दर 2800 रुपयांनी घसरले. चीननं देखील अमेरिकेविरोधात 34 टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा केली आणि यानंतर काही तासात सोन्याचे दर घसरले.
सोन्याचे दर किती घसरले?
शुक्रवारी सायंकाळी 7.34 वाजता 10 ग्रॅम सोन्याचे दर 90057 वरुन 88099 वर आले. म्हणजेच एकूण 2.17 टक्के घसरण झाली. ग्लोबल स्पॉट गोल्ड प्राईस देखील 2.4 टक्क्यांनी घसरुन 3041.11 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.
सोन्याचे दर का घसरले?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेमुळं बाजार ट्रेड वॉरच्या शक्यतेला लक्षात घेऊन तयार होता. मात्र, अमेरिकेनं टॅरिफ लादण्याची अधिकृत घोषणा करताच अनेकांनी प्रॉफिट बुकिंग सुरु केलं. गेल्या काही महिन्यांपासून ट्रेड वॉरचा परिणाम दिसण्यास सुरुवात झाली होती. यामुळं टॅरिफच्या बातमीवर शिक्कामोर्तब होताच गुंतवणूकदारांनी नफा वसूल करण्यास सुरुवात केली. रशिया यूक्रेन आणि मध्य पूर्वेतील तणाव कमी झाला आहे त्यामुळं सोन्या सारखा गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय गुंतवणुकीसाठी निवडण्याची शक्यता कमी होऊ शकते.
तांत्रिक पातळीवर काय स्थिती?
कॉमेक्सवर सोन्याचे दर 3120 ते 3130 च्या दरम्यान स्थिरावले आहेत. जर सोन्याचे 3050 डॉलर प्रति औंसच्या खाली आल्यास सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊ शकते.
भारतात सोनं स्वस्त होणार?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोने आणि चांदी यावर टॅरिफ लादलेलं नाही. यामुळं पुरवठ्याच्या बाजूनं चिंता कमी झाली आहे कॉमेक्सवरील दबाव यामुळं वाढू लागला आहे. यामुळं देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरावर दबाव वाढून त्यात घसरण होऊ शकते. 10 ग्रॅम सोन्याचे 88800 रुपयांवर टिकून राहणं अवघड दिसत आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्यास ते 87000 रुपयांपर्यंत येऊ शकतं.
सोने दरातील घसरणीचा ट्रेंड कायम राहिल्यास 10 ग्रॅमचा दर 84000 रुपयांपर्यंत घसरु शकतो.अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हनं यावर्षी व्याज दरात लवकर कपात केली जाणार नाही हे जाहीर केलं आहे. त्यामुळं सोन्याच्या दरावर दबाव कायम राहू शकतो.
डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे अध्यक्ष स्वीकारल्यानंतर टॅरिफ लादण्याचे संकेत दिले होते. 31 डिसेंबरला सोन्याचे दर 79000 हजारांच्या दरम्यान होते. ते सोन्याचे दर जीएसटी आणि इतर करांसह 94000 पर्यंत पोहोचले होते. आता त्यामध्ये थोडी घसरण सुरु झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
























