Gold And Silver Rate Today : सोनं, चांदी झाले स्वस्त, नेमकं कारण काय? 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?
गेल्या काही दिवसांपूर्वी सोन्याचा दर वाढत होता. आता मात्र सोन्याचा भाव कमी होत आहे. भविष्यातही ते आणखी स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दराने (Gold Rate Today) चांगलाच उच्चांक गाठला होता. ऐन लग्नसराईत सोन्याचा दर वाढल्यामुळे सामान्यांची चांगलीच पंचाईत झाली होती. दरम्यान, काही दिवसांपासून सातत्याने दरवाढ झाल्यानंतर आता याच सोन्याचा दर कमी होत आहे. गेल्या दहा दिवसांपासून सोनं प्रति दहा ग्रॅम 2500 रुपयांनी कमी झालं आहे. सोन्याचा दर कमी झाल्यामुळे आता सामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
सोन्याचा भाव कमी (Gold Rate Today)
मिळालेल्या माहितीनुसार एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा दर कमी झाला. मात्र चांदीचा दर हा सहा रुपये प्रतिकिलोने कमी झाला. एमसीएक्सवर चांदीचा दर प्रतिकिलो 82,500 रुपये होता. गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या दरात कमी होत आहे. 16 एप्रिल रोजी सोन्याचा दर प्रति दहा ग्रॅमला 74 हजार रुपयांपर्यंत पोहोचला होता. मात्र हेच सोनं सध्या कमी होत आहे. सध्या सोन्याचा दर हा 71486 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत खाली आला आहे. पाच जूनच्या वायद्यासाठी हा सोन्याचा दर आहे.
चांदीच्या दरात काय बदल झाला? (Silver Rate Today)
सोन्यासह चांदीच्या दरातही गेल्या दहा दिवसांत घट झाली आहे, आज एमसीएक्सवर चांदीचा दर 82 हजार 500 रुपयांपर्यंत खाली आहे. म्हणजेच चांदीचा दरही प्रतिकिलो साधारण 2500 रुपयांनी कमी झाला आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या दरात घट झाली आहे.
सोन्याचा दर का कमी होतोय?
काही दिवसांपूर्वी इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात होती. इंधनाचा दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याच काळात सोनंही चांगलंच महागलं होतं. दोन्ही देशांतील या तणावात सोन्याचा दर 74 हजार प्रति दहा ग्रॅमपर्यंत वाढला होता. कालानंतराने इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाची शक्यता कमी होत गेली, परिणामी सोन्याचा दरही कमी होत गेला. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार आता सोन्याचा दर 70 हजार रुपये प्रति ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतो. सोने आणि चांदीचा दर असाच कमी झाला तर, लग्नसराईत सोने धातूची खरेदी करणाऱ्या सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.
हेही वाचा :
गेल्या वर्षाचा ITR या वर्षी भरता येईल का? दंड किती लागतो? जाणून घ्या नियम काय सांगतो!
घरासाठी कर्ज घेण्याचा विचार करताय? 'या' बँकांचा आहे सर्वांत कमी व्याजदर!
शेतकऱ्यांनो 'या' तीन योजनांचा घ्या फायदा, आर्थिक अडचण हमखास होईल दूर!