Who is Renuka Jagtiani : कधीकाळी नवरा चालवायचा टॅक्सी, आज आहेत अब्जाधीश; फोर्ब्सच्या यादीत समावेश झालेल्या रेणुका जगतियानी कोण आहेत?
रेणुका जगतियानी यांचा अब्जाधीशांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
मुंबई : फोर्ब्सने नुकतेच अब्जाधीशांची (Forbes Billionaires List) यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील 25 नव्या उद्योजगकांचा समावेश झाला आहे. म्हणजेच भारतात आता 25 नवे अब्जाधीश उदयास आले आहेत. यात लँडमार्क ग्रुपच्या अध्यक्ष रेणुका जगतियानी (Who Is Renuka Jagtiani) यांचाही समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर अब्जो रुपयांची संपत्ती असणाऱ्या या रेणुका जगतियानी (Renuka Jagtiani) कोण आहेत? असे विचारले जात आहे.
फोर्ब्सने नुकतेच जारी केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत जगभरात एकूण 2781 लोकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये रेणुका जगतियानी या 660 क्रमांकावर आहेत. भारताच्या दृष्टीकोनातून सांगायचे झाल्यास भारतातील अब्जधीशांच्या यादीत त्या 44 व्या स्थानी आहेत.
रेणुका जगतियानी कोण आहेत?
रेणुका जगतियानी (70 वर्षे) या लँडमार्क ग्रुपच्या अध्यक्ष आहेत. त्यांचे पती मिकी गतियानी यांनी 1973 साली या उद्योग समुहाची स्थापना केली होती. मिकी यांच्या निधनानंतर रेणुका जगतियानी यांनी खंबीरपणे या ग्रुपचा कारभाग सांभाळला. विशेष म्हणजे रेणुका यांच्या नेतृत्वाखाली लँडमार्क उद्योगसमूहाने यशाची शिखरं गाठली. आज हा समूह जगतील 24 देशांत पसरला आहे. मध्य पूर्व, आफ्रिका, दक्षिणपूर्व आशिया या भागांत लँडमार्क ग्रुप यशस्वीपणे आपला उद्योग उभारलेला आहे.
लँडमार्क ग्रुपकडे 50 हजार कर्मचारी
गेल्या दोन दशकांपासून रेणुका जगतियानी लँडमार्क ग्रुपचे नेतृत्व करत आहेत. आज या उद्योगसमुहात 50 हजार कर्मचारी काम करतात. हा उद्योग समूह हॉस्पिटॅलिटी, अन्न, रिटेल क्षेत्रातील वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करतोय.
पती चालवायचे टॅक्सी
मिळालेल्या माहितीनुसार रेणुका जगतियानी यांचे पती मिकी जगतियानी यांनी लँडमार्क ग्रुपची स्थापना करण्यासाठी तो वाढवण्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत. सुरुवातीला मिकी जगतियानी लंडनमध्ये टॅक्सी चालवायचे. भाऊ, आई-वडील यांच्या निधनामुळे मिकी जगतियानी यांना लंडन सोडून बहरीनला जावे लागले. तेथे मिकी गजतियानी त्यांच्या भावाचे खेळण्याचे दुकान सांभाळू लागले. मात्र हळूहळू त्यांनी याच व्यवसायात मोठी प्रगती केली. त्यांच्या या एका दुकानाची हळूहळू दहा दुकानं झाली. तेथेच त्यांनी लँडमार्ग ग्रुपची स्थापना केली.
रेणुका जगतियानी यांचा जगभरात सन्मान
रेणुका जगतियानी यांच्या कामाची दखल जगभरात घेण्यात आलेली आहे. त्यांना 2007 साली आऊटस्टँडिंग एशियन बिझनेस वुमन हा पुरस्कार देण्यात आला होता. 2014 साली जागतिक उद्योजकता फोरमतर्फे त्यांना Entrepreneur of the World या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. फोर्ब्सने 2021 साली रेणुका जगतियानी यांचा जगातील सर्वांत प्रभावशाली महिलांच्या यादीत समावेश केला होता. या यादीत त्या 96 व्या स्थानी होत्या.
हे ही वाचा :
गौतम अदाणी यांचे बंधू विनोद अदाणी यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?