EPFO : पीएफ खात्यातून पैसे काढायचेत, अपलोड केलेल्या चेकवर नाव नसल्यास क्लेमचं पुढं काय होतं? जाणून घ्या
EPFO : पीएफ खात्यातून अनेकदा आर्थिक अडचणींमुळं पैसे काढून घ्यावे लागतात. पीएफ खात्यातून अॅडव्हान्स काढण्यासाठी क्लेम करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.

EPFO News मुंबई : संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांच्या पगारातील ठराविक रक्कम कर्मचारी भविष्य निर्वाह निधीत जमा केली जाते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएएफओकडे कर्मचाऱ्याच्या पगाराच्या मूळ वेतनाच्या 12 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते. तर, तो कर्मचारी ज्या आस्थापनेत काम करत आहे त्यांच्याकडून 8.5 टक्के रक्कम पेन्शन खात्यात तर 3.5 टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा केली जाते.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडून कर्मचाऱ्यांच्या योगदानातून जमा झालेली रक्कम विविध ठिकाणी गुंतवण्यात येते. त्यातून येणाऱ्या परताव्यातून दरवर्षी कर्मचाऱ्यांना व्याज दिलं जातं. नोकरदारांना आर्थिक अडचण निर्माण झाल्यास अनेकदा पीएफ खात्यातून रक्कम काढून घ्यावी लागते. पीएफ खात्यातून रक्कम काढण्यासाठी ईपीएफओच्या वेबसाईटवर ऑनलाईन क्लेम करावा लागतो.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीद्वारे जमा करण्यात आलेली रक्कम अनेकदा आर्थिक गरजा भागवण्यासाठी काही प्रमाणात काढून घ्यावी लागते. त्यावेळी पीएफ खात्यात यूएएन क्रमांकाद्वारे लॉगीन करुन पैसे काढावे लागतात.
पीएफ खात्यातून पैसे काढायचे असल्यास ते आजारावरील उपचार, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी काढता येतात. आपत्कालीन परिस्थितीत उपचार करायचे असल्यास पीएफ खात्यातून रक्कम काढता येते. मुलांच्या शिक्षणासाठी देखील पीएफ खात्यातून रक्कम काढली जाऊ शकते. तुम्ही तुमच्या लग्नासाठी किंवा भाऊ, बहीण, मुलगा आणि मुलीच्या लग्नासाठी देखील पैसे काढू शकता. त्यासाठी ठराविक वर्षांचा सेवाकाल पूर्ण करणं आवश्यक असतं. घर खरेदी किंवा घराच्या दुरुस्तीसाठी देखील पीएफ खात्यातून पैसे काढता येतात.
घर खरेदीसाठी किंवा घर बांधणीसाठी पीएफ खात्यातून पैसे काढायचे असतील तर किमान 5 वर्ष सेवा पूर्ण झालेली असणं आवश्यक असतं. यामध्ये पीएफ खातेदार, कंपनीनं पीएफ खात्यात भरलेली रक्कम आणि व्याज पूर्णपणे काढता येऊ शकतं. कर्ज परतफेडीसाठी पीएफ खात्यातून पैसे काढायचे असल्यास सेवा कालावधी 10 वर्ष पूर्ण असणं आवश्यक असतं. लग्न आणि मुलांच्या शिक्षणाच्या कारणासाठी पैसे काढायचे असल्यास किमान 7 वर्ष सेवा झालेली असणं आवश्यक असतं. आजारपणाच्या कारणासाठी पीएफ खात्यातून पैसे काढायचे असल्यास सेवा कालावधी अट नाही.
पीएफ क्लेम करताना योग्य चेक अपलोड करणं महत्त्वाचं
पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी फॉर्म नंबर 31 भरुन द्यावा लागतो. काही प्रकरणांमध्ये चेक किंवा पासबूकचं पहिलं पान अपलोड करावं लागतं. चेक अपलोड करताना त्याच्यावर नाव छापलेलं नसल्यास क्लेम नाकारला जातो. चेकवर ईपीएफओकडे असलेल्या बँक खात्याचा तपशील असणं आवश्यक असतं. क्लेम नाकारला जाऊ नये यासाठी नाव प्रिंट असलेला चेक क्लेम काढताना अपलोड करावा.
इतर बातम्या :

























