Gold Rate : सोन्याच्या दरात मोठी वाढ, सोनं 91000 रुपयांजवळ, 10 ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागणार?
Gold Rate : भारतीय बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ सुरु आहे. सोन्याचे दर 91 हजारांच्या जवळ पोहोचले आहेत.जीएसटीसह दराचा विचार केल्यास अधिक रक्कम द्यावी लागेल.

मुंबई : सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ सुरु आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात वाढ होऊन ते 90980 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात सातत्यानं वाढ सुरु आहे. एमसीएक्स वर देखील सोन्याच्या दरात मोठी वाढ दिसून आली. गोल्ढ फ्यूचर्समध्ये 0.35 टक्के होऊन 312 रुपयांची वाढ होऊन ते 88696 रुपये प्रति 10 ग्रॅम वर पोहोचलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. स्पॉट गोल्ड 3079.01 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे. यूएस गोल्ड फ्यूचर्स 3086.80 डॉलर प्रति औंसवर पोहोचलं आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं महागणार
तज्ज्ञांच्या मते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणामुळं जगावर व्यापार युद्धाचा धोका वाढला आहे. यामुळं सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार प्राधान्य देत आहेत. सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. त्यामुळं जगभरात अस्थिरता निर्माण झाल्यास सोन्यातील गुंतवणूक वाढते पर्यायानं त्याच्या दरात वाढ होते. तज्ज्ञांच्या मते सोन्याच्या दरातील वाढीचा ट्रेंड कायम राहील. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3100 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचले आहेत.
सोन्याच्या दरासाठी 2025 हे वर्ष चांगलं दिसून येत आहे. सोन्याच्या दरात पहिल्या तीन महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात 15.4 टक्के वाढ झाली आहे. भारतात सोन्याच्या दरात 14 टक्के वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात सुरु असलेली तेजी यामुळं यातील गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे. बँक ऑफ अमेरिकेनं सोन्याच्या दरासाठीचं टारगेट वाढवलं आहे. त्यांच्या अंदाजानुसार सोन्याचे दर 3305 डॉलर प्रति औंस पर्यंत जातील. सोन्यातील गुंतवणूक अशाच प्रकारे वाढत राहिल्यास ते 3500 डॉलर प्रति औंस पर्यंत जाऊ शकतात.
बँक ऑफ अमेरिकाच्या रिपोर्टमध्ये आणखी एक गोष्ट सांगण्यात आली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँका सोन्यातील गुंतवणूक वाढवत आहेत. सध्या जगभरातील मध्यवर्ती बँकांकडे राखीव सोनं 10 टक्के आहे. त्यामध्ये वाढ होऊन ते 30 टक्क्यांपर्यंत जाऊ शकतं. जगभरातील राजकीय अस्थिरता वाढल्यास आणि देशातील सरकारांनी सहकार्याची भूमिका ठेवल्यास सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागू शकतो.
वित्तीय सल्लागारांच्या मते गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवणुकीत सोन्याचा समावेश केला पाहिजे. गुंतवणूकदरांनी 10-15 टक्के गुंतवणूक सोन्याच्या दरात करणं आवश्यक आहे. यामुळं गुंतवणूकदारांचा पोर्टफोलिओ वैविध्यपूर्ण होऊ शकतो. सोन्यातील गुंतवणुकीसाठी गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंडच्या गोल्ड योजनांमध्ये गुंतवणूक करु शकता. गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करायची असल्यास डीमॅट खातं आवश्यक असतं. तर, म्युच्युअल फंड गोल्ड योजनांमध्ये गुंतवणूक करायची असल्यास डीमॅट खातं नसलं तरी चालतं.
























