(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PAN 2.0 : क्यूआर कोड असलेलं डिजिटल पॅन कार्ड मोफत मिळणार, प्रिंट हवी असल्यास पैसे मोजावे लागणार, किती पैसे भरावे लागणार?
PAN 2.0 Printing Charges : PAN 2.0 प्रकल्पाद्वारे ई कार्ड मोफत मिळणार आहे. पॅनकार्ड धारकांना प्रिंट हवी असल्यास पैसे भरावे लागणार आहेत.
PAN 2.0 Charges नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीनं प्राप्तिकर विभागाचया PAN 2.0 प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारनं या प्रकल्पासाठी 1435 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे. भारतातील पॅन कार्ड धारक आणि टॅन कार्ड धारकांना दर्जेदार आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी एक नवा प्लॅटफॉर्म तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार पॅन आणि टॅनच्या सर्व सेवांसाठी एका पोर्टलची निर्मिती करण्यात येणार आहे. नव्या 2.0 प्रकल्पानुसार क्यू आर कोड असणारी पॅन कार्ड जारी केली जाणार आहेत. ज्यांच्याकडे जुनं पॅन कार्ड असेल ते देखील वैध राहणार आहे. पॅन कार्ड धारकांना क्यू आर कोड असलेलं नवं ई पॅनकार्ड मोफत उपलब्ध करुन दिलं जाणार आहे. मात्र,प्रिंट हवी असल्यास त्यासाठी रक्कम भरावी लागणार आहे.
क्यू आर कोड असलेल्या पॅन कार्डच्या प्रिंटसाठी किती रक्कम भरावी लागणार?
पॅन कार्डमध्ये माहिती अपडेट करायची असल्यास किंवा दुरुस्ती करायची असल्यास त्या सेवा मोफत असतील. ई पॅन कार्ड संबंधित कार्ड धारकाला ईमेल आयडीवर पाठवलं जाणार आहे. पॅन कार्डची प्रिंट हवी असल्यास संबंधित कार्डधारकाला 50 रुपयांच्या शुल्कासह अर्ज दाखल करावा लागेल. भारताबाहेर पॅन कार्ड पाठवायचं असल्यास 15 रुपये अधिक भरावे लागतील.
क्यू आर कोड नसलेलं पॅन कार्ड धारकांना अद्ययावत प्रणालीअंतर्गत (पॅन 2.0)नव्या पॅन कार्ड साठी अर्ज करावा लागणार नाही. सध्या ज्यांच्याकडे पॅन कार्ड आहेत त्यांना काही बदल करायचे असल्यास म्हणजेच ईमेल, मोबाईल क्रमांक, पत्ता, नाव, जन्मतारीख यासारख्या गोष्टी अपडेट करायच्या असतील तर पॅन 2.0 प्रकल्प अस्तित्वात आल्यानंतर मोफत करता येणार आहेत.
पॅन 2.0 प्रकल्प सुरु करण्याचं कारण?
सध्या पॅन कार्ड संदर्भातील सेवा तीन वेगवेगळ्या पोर्टलव उपलब्ध आहेत. नव्या प्रकल्पामध्ये पॅन 2.0 पॅन कार्ड आणि टॅन एकाच पोर्टलवर आणल्या जाणार आहेत. आधार पॅन लिंकिंग, पॅन वेरिफिकेशन करणे, ई पॅन साठी विनंती, पॅन कार्ड प्रिंटींग यास इतर प्रक्रिया एकाच पोर्टलवर उपलब्ध होणार आहेत.
एक व्यक्ती किती पॅन कार्ड काढू शकतो?
प्राप्तिकर कायदा 1961 च्या तरतुदींनुसार कोणताही व्यक्ती एका पेक्षा अधिक पॅनकार्ड काढू शकत नाही. एखाद्या व्यक्तीकडे एकापेक्षा अधिक पॅन कार्ड असल्यास ते प्रादेशिक मूल्यांकन अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत अधिकचं पॅन कार्ड रद्द आवश्यक आहे.
इतर बातम्या :