(Source: ECI/ABP News/ABP Majha)
HealthCare Budget: हेल्थकेयर उपकरणावरील कस्टम ड्युटी कमी करण्याची होतेय मागणी; नक्की कारण काय?
HealthCare Budget 2023: 1 फेब्रुवारी 2023 च्या आगामी अर्थसंकल्पात आरोग्य सेवेशी संबंधित उपकरणांवरील कस्टम ड्युटी आणि आरोग्य करात सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. जाणून घ्या, सध्या किती कर आकारला जातो...?
HealthCare Budget 2023: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance minister Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी 2023 रोजी अर्थसंकल्प (Budget 2023) सादर करणार आहेत. या बजेटमध्ये हेल्थकेयर टेक इंडस्ट्रीच्या (Healthcare Tech industry) बजेटमध्ये वाढ अपेक्षित आहे. संपूर्ण आरोग्य व्यवस्था सुधारण्याची गरज असल्याचं सांगितलं जात आहे. अशातच, मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियानं (Medical Technology Association of India) देशातील आरोग्य सेवेशी संबंधित उपकरणांवरील कस्टम ड्युटी कमी करण्याची आणि त्यावरील हेल्थ टॅक्स हटवण्याची मागणी केली आहे. जाणून घ्या, यामागील कारण काय?
सीमाशुल्क कमी करण्याची मागणी
हेल्थकेयर टेक जगतानं अर्थसंकल्प-2023 मध्ये वैद्यकीय उपकरणांवरील सीमाशुल्कात कपात करण्याची मागणी केली आहे. मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियानं (MTAI) केंद्रातील मोदी सरकारला (Modi Govt) आयात वैद्यकीय उपकरणांवरील (Imported Medical Devices) सीमाशुल्क कमी करण्याची आणि आरोग्य कर हटवण्याची विनंती केली आहे.
80 टक्के उत्पादनं आयात केली जातात
देशातील वैद्यकीय तंत्रज्ञानाशी संबंधित कंपन्या आज 80 टक्के वैद्यकीय उपकरणं आयात करत असल्याची माहिती मेडिकल टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियानं दिली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष आणि महासंचालक पवन चौधरी म्हणतात की, भारत जगातील वैद्यकीय उपकरणांवर सर्वाधिक सीमाशुल्क लादलं जात आहे आणि त्याचा थेट परिणाम रुग्णांच्या आर्थिक स्थितीवर होतो.
बजेटची तयारी सुरू
चौधरी म्हणतात, "केंद्रीय अर्थसंकल्प 2023 ची तयारी सुरू असताना, आम्हाला सीमाशुल्क आणि वैद्यकीय उपकरणांवर आकारण्यात येणार्या करांमध्येही सुधारणा अपेक्षित आहे." ते म्हणाले की, सरकारी खर्चात या क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. हे साध्य करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य खर्चात वाढ करून आरोग्य सेवेची मागणी आणि पुरवठ्यातील सध्याची तफावत भरून काढण्याची गरज आहे. हेल्थकेयर टेक इंडस्ट्रीला जागतिक स्तरावर चालना देण्यासाठी सरकारनं एक पाऊल उचलंलं पाहिजे आणि त्यासाठी वेगळ्या बजेटचा विचार करण्याची गरज आहे.
वैद्यकीय उपकरणांवर किती आकारला जातो कर?
चौधरी म्हणाले की, या अधिकच्या सीमा शुल्कामुळे भारतातील वैद्यकीय उपकरणांच्या किमतीवर विपरित परिणाम झाला आहे. तो 2.5 टक्क्यांवर आणला पाहिजे. शिवाय, आयात केलेल्या वैद्यकीय उपकरणांवर लावण्यात आलेल्या 5 टक्के आरोग्य उपकरामुळे उद्योगावरील भार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हा कर हटवला पाहिजे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :