(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खुशखबर! आता सोनं-चांदी होणार स्वस्त, सीमा शुल्कात घट करण्याचा केंद्राचा मोठा निर्णय
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाअंतर्गत सरकारने वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद केली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी मोदी 3.0 सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Union Budget 2024) सादर केला आहे. या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी पायाभूत सुविधा, कृषी, महिला, रोजगार, शिक्षण या क्षेत्रांच्या विकासासाठी भरीव तरतूद केली आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पात सरकारने कररचनेतही बदल केला आहे. तसेच सोने आणि चांदीवरील सीमा शुल्कात (Custom Duty) कपात केली आहे. या निर्णयामुळे आता सोने आणि चांदी हे धातू स्वस्त होणार आहेत
निर्मला सीतारामन यांनी काय घोषणा केली?
गेल्या अनेक दिवसांपासून केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पाची चर्चा होती. या अर्थसंकल्पात सोने-चांदीचा दर कमी होण्यासाठी काही करतूद होणार का? असे विचारले जात होते. दरम्यान, आज प्रत्यक्ष अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोने-चांदीच्या दराबाबत खुशखबर मिळाली आहे. सरकारने सोने-चांदीच्या सीमा शुल्कात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी सोने-चांदीचे सीम शल्क 15 टक्के होते. आता यात कपात करून सीमा शुल्क थेट 6 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. म्हणजेच सरकारने सीमा शुल्क थेट अर्ध्यापर्यंत कमी केले आहे. त्यामुळे आता या मौल्यवान धातूंची किंमतही कमी होण्याची शक्यता आहे.
नेमका काय बदल झाला?
सोने, चांदीवरील सीमा शुल्क - 6 टक्के
प्लॅटिनमवरील सीमा शुल्क- 6.4 टक्के
अमोनिअम नायट्रेटवरील सीमा शुल्क 7 टक्क्यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे.
नव्या कररचनेत नवं काय?
स्टँडर्ड डिडक्शन 50 हजारांवरुन 75 हजारांवर
3 लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्स फ्री
3 ते 7 लाख उत्पन्न - 5 टक्के आयकर
7 ते 10 लाख उत्पन्न- 10 टक्के आयकर
10 ते 12 लाख उत्पन्न - 15 टक्के आयकर
12 ते 15 लाख उत्पन्न - 20 टक्के आयकर
15 लाखांवर उत्पन्न - 30 टक्के आयकर
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने वाढ झालेली आहे. सोन्याचा भाव थेट एक लाखांपर्यंत जातो की काय, अशी शंका काही दिवसांपूर्वी व्यक्त केली जाऊ लागली. सोने या धातूपासून लोक दागिने करतात. सोनं महागल्यामुळे सामन्य लोकांना दागिने खरेदी करणे अवघड झाले होते. पण आता सीमा शुल्कात घट होणार असल्यामुळे लवकरच सोने आणि चांदी स्वस्त होऊ शकते.
हेही वाचा :