Budget 2021 healthcare | आरोग्याच्या बजेटमध्ये 137 टक्क्यांची विक्रमी वाढ; वैद्यकीय तज्ञांच्या मते, स्वागतार्ह पाऊल, पण अंमलबजावणी महत्त्वाची
Budget 2021 healthcare : कोरोनाच्या सावटाखाली सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी अधिकचा निधी जाहीर करावा अशी स्तरातून मागणी होत होती. अशातच यंदाच्या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी 2 लाख 23 हजार 846 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
Budget 2021 healthcare : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात 2 लाख 23 हजार 846 कोटीची तरतूद आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रासाठी भरीव निधी देण्यात आला असून तो 137 % इतका वाढला आहे. पहिल्यादांच एवढा मोठा निधी आरोग्य क्षेत्रासाठी देण्यात आल्याने नागरिकांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. तसेच कोरोनाच्या लसीसाठी 35 हजार कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात कारण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांनी आरोग्य क्षेत्रात अर्थसंकल्पात विक्रमी वाढ केल्याने त्यांचे स्वागत केले आहे. मात्र त्याचवेळी ज्या योजना जाहीर केल्या आहेत. त्या सर्व योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी आशा व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या सावटाखाली सादर होणाऱ्या या अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी अधिकचा निधी जाहीर करावा अशी स्तरातून मागणी होत होती. त्याप्रमाणे यंदाच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद झालेली पाहावयास मिळत आहे. मात्र ज्या पद्धतीने या आरोग्य क्षेत्राबाबत विविध गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यापद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला काय येत आहे हे पाहणे औत्युसुक्याचे ठरणार आहे.
राज्य कोरोना विशेष कृती दलाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले, की, "कोरोनाच्या काळात देशात सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद महाराष्ट्र राज्यात झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्याने ज्या पद्धतीने या कोरोनाच्या आजाराशी मुकाबला करून त्यावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळविलं आहे. त्याकरिता या राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं सक्षमीकरणासाठी आरोग्य क्षेत्रासाठी अधिकचा निधी महाराष्ट्राला द्यावा असं वाटतं. विशेष म्हणजे यंदाच्या आरोग्य क्षेत्रासाठी जी वाढीव तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे ते स्वागतार्ह आहे. मात्र निधी वाटप करताना राज्यनिहाय परिस्थिती पाहून न्याय पद्धतीने त्याचे वाटप करणे गरजेचे आहे."
आरोग्यच्या अनुषंगाने अर्थसंकल्पात विविध गोष्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या वाढविणे. लहान मुलांच्या पोषणासाठी लागणार निधी, न्यूमोकॉकल व्हॅक्सिन देशभरात देणार, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था उभारणार, या आणि अशा अनेक योजना या करण्यात आल्या आहेत. तर मुंबई शहराच्या कोरोना मृत्यू विश्लेषण समितीचे अध्यक्ष आणि केइएम रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांच्या मते, "आरोग्य क्षेत्रासाठी एका वर्षासाठी वाढ केली. त्यामुळे त्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल होतील असे नाही. आरोग्य क्षेत्रातील सुधारणा होण्यासाठी काही कालावधी जाणे गरजेचे आहे. या अर्थसंकल्पात वाढ ज्या पद्धतीने करण्यात आली आहे. त्याच स्वरूपाची वाढ पुढील 5-10 वर्षे होणे अपेक्षित आहे. त्यामुळे यंदा जी वाढ केली आहे. त्याबद्दल समाधान आहे. यंदाच्या निधीत त्यांनी 35 हजार कोटी थेट कोरोनाच्या लसीकरणासाठी ठेवले आहेत, त्यामुळे गोरगरिबांना लस मोफत मिळू शकेल. जो काही निधी मंजूर झाला आहे. आता त्या निधीचा योग्य पद्धतीने आणि वेळेवर वापर होणे गरजेचा आहे."
याप्रकरणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र, डॉ अविनाश भोंडवे यांनी सांगितले की, "या वर्षी आरोग्य क्षेत्रातील वाढवला हि बाबा स्वागतार्ह आहे. मात्र तो निधी अजूनही अपुराच आहे. गेली अनेक वर्षे या क्षेत्राला दुर्लक्षित ठेवण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निधी वाढविण्यात आला आहे. मात्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचं मजबुतीकरण करण्यासाठी अधिकचा निधीची गरज आहे. आरोग्य क्षेत्रातील होणारी अर्थसंकल्पातील वाढ ही कायम अशीच यापुढे वाढत राहिली पाहिजे नाही तर यावेळी केवळ कोरोनाचे सावट होते म्हणून वाढ करून द्यायची आणि पुढच्या बजेट मध्ये कमी करायचे असे चालणार नाही. या बजेट मध्ये वाढीव तरतुदींबरोबर पुढील तीन वर्षात आणखी काय योजना करणार त्याची माहिती याच बजेटमध्ये दिली असती तर बरे झाले असते. मात्र त्यानी ज्या गोष्टी आरोग्यच्या बजेटमध्ये जाहीर केल्या आहेत. त्याबद्दल अधिक सुस्पष्टता येणे गरजेचे आहे. जसे की 15 एमेरजन्सी हॉस्पिटल उघडणार पण ती कुठे आणि कशा पद्धतीने असणार हे माहिती होणे गजरेचे आहे."
महत्त्वाच्या इतर बातम्या :